कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीतून हकालपट्टी, पंतप्रधानांचीही तीच गत
वृत्तसंस्था/ बिजिंग
चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना निष्प्रभ करण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या 20 व्या परिषदेत माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचा अवमान करण्यात आल्याची घटना घडली आहे. जिंताओ यांना भरबैठकीतून जबरदस्तीने बाहेर नेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून तो असंख्य लोकांनी पाहिला आहे.
हू जिंताओ हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे ज्येष्ठ नेते आहेत. जिनपिंग 2013 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी जिंताओ ते पद सांभाळत होते. त्यांनी चीनच्या घटनेनुसार दोन कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदत्याग केला होता. पदत्यागानंतरही ते कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकींना मार्गदर्शन करीत होते.
पंतप्रधानांनाही हटविले
क्षी जिनपिंग यांच्या सांगण्यावरून चीनचे पंतप्रधान ली केकीयांग यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचे पक्षप्रमुख पद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्यासह आणखी तीन ज्येष्ठ पक्ष पदाधिकाऱयांना हटविण्यात आले आहे. आता या चार नेत्यांची नियुक्ती नियमानुसार पुन्हा पॉलिटब्युरोमध्ये होऊ शकणार नाही. त्यामुळे क्षी जिनपिंग यांचे चीनची निरंकुश सत्ता मिळविण्याचे ध्येय साकार झाले आहे. जगभरात या घडामोडींची मोठी चर्चा होत आहे.
आयुष्यभर राष्ट्रपती राहणार
क्षी जिनपिंग आता त्यांचे आयुष्य असेपर्यंत चीनचे अध्यक्ष राहू शकतील. काही महिन्यांपूर्वी त्यांनी तसा प्रस्ताव पक्षाकडून संमत करून घेतला होता. तथापि यामुळे आपल्या ज्येष्ठ सहकाऱयांची नाराजीही त्यांनी ओढवून घेतली होती. ताज्या घडामोडींमुळे जिनपिंग यांचे कम्युनिस्ट पक्षावरचे एकहाती नियंत्रण स्पष्ट झाले.
पक्षाची बैठक समाप्त
गेले सात दिवस चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय बैठक सुरु होती. ती शनिवारी समाप्त झाली. बैठकीच्या शेवटच्या दिवशी शांघाय पार्टीचे प्रमुख हान झेंग पक्षाचे प्रमुख सल्लागार वांग यांग आणि राष्ट्रीय पिपल्स काँग्रेसचे प्रमुख ली झांसू यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. झांसू हे जिनपिंग यांच्या जवळचे मानले जात होते. पण जिनपिंग यांनी त्यांनाही दया माया दाखविली नाही, असे दिसून येत आहे. या घटनेचे दुरगामी परिणाम होतील असा तज्ञांचा इशारा आहे.
भारत-चीन तणाव वाढणार?
चीनमध्ये क्षी जिनपिंग यांना आता कोणीच प्रतिस्पर्धी उरलेला नाही. त्यामुळे ते पुन्हा एकदा अधिक आक्रमक होऊन भारताकडे मोर्चा वळवतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात जवळपास 4000 कि.मी. लांबीची सीमारेषा आहे. चीनच्या सेनेने अनेकदा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असते. त्यातच चीनने लडाख सीमेवरही आघाडी उघडल्याने भारताला तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागत आहे. आता जिनपिंग यांच्यावर कोणाचेच निर्बंध नसल्याने भारत आणि चीन यांच्यातील संबंधांचे भवितव्य चर्चिले जाऊ लागले आहे. भारतानेही चीनचा प्रतिकार करण्यासाठी सीमेवरील सज्यता वाढविली आहे.
इतर देशांवरही परिणाम
जिनपिंग यांना चीनमध्ये कोणताही आव्हानवीर उरला नसल्याने चीनच्या इतर देशांशी असलेल्या संबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांना काहीवेळा चीनने आव्हान दिले होते. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी अनेकदा चीनला समज दिली आहे. यापुढे चीन प्रशांत भारतीय महासागरातील स्थानी अधिक लष्करी दबाव निर्माण करू शकतो. भूतानसारख्या छोटय़ा देशालाही आपल्या प्रभावात घेण्याचा प्रयत्न करू शकतो.
दूरगामी परिणाम
@सर्व ज्येष्ठ नेते चिनी कम्युनिस्ट पक्षात निष्प्रभ होण्याच्या मार्गावर
@क्षी जिनपिंग यांची पक्षावर आणि देशावर निर्विवाद निरंकुश सत्ता
@भारत आणि जगातील इतर देशांवर आर्थिक परिणामांची शक्यता
@पक्षासह देशाचे प्रशासन आणि चिनी सेनेवरही जिनपिंग झाले स्वार









