शहरवासियांचे आरोग्य धोक्यात : समस्यांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे शहरवासियांना वेळेत पाणीपुरवठा झाला नाही. पावसाला जोरदार प्रारंभ झाल्यानंतर हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. आता शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. पण संपूर्ण शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असून शहरवासियांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
ऊन-पावसामुळे शहरवासियांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. अशातच एल अँड टी कंपनीकडून दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरवासियांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी लक्ष्मीटेकडी आणि बसवनकोळ्ळ येथे जलशुद्धीकरण केंद्र सुरू केले आहे. पण सध्या शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे समस्येत आणखीनच भर पडली आहे. पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे तर पावसामुळे पाणीपुरवठा बंद ठेवल्याने पाणी विकत घ्यावे लागले. तर आता वेळेत पाणी येऊनदेखील दूषित पाण्यामुळे आजाराचा सामना करून वैद्यकीय उपचारांसाठी पैसे भरण्याची वेळ आली आहे. येनकेन मार्गे नागरिकांचे हाल होत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नागरिकांच्या या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे
एल अँड टी कंपनीने पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार हाती घेऊन वर्ष उलटले तरीही पाणी नियोजनाचे वेळापत्रक सुरळीत झाले नाही. तक्रारी करूनदेखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. पावसाळय़ात दूषित पाण्याची समस्या उद्भवते. पण शुद्धीकरणाचा स्तर वाढवून शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, एल अँड टी कडून ही प्रक्रिया व्यवस्थितपणे केली जात नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.









