लहान मुलांचे आरोग्य बिघडले
बेळगाव : शहराच्या विविध भागात पाणीटंचाईची झळ बसत आहे. अशातच ड्रेनेज वाहिन्या आणि गटारीचे बांधकाम अर्धवट झाल्याने विहिरी, कूपनलिका दूषित होण्याचे प्रकार वाढले आहेत. मारुती गल्ली, खासबाग येथील गटारीचे बांधकाम अर्धवट झाल्याने सांडपाणी साचून विहिरींमध्ये पाझरत आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे लहान मुले आजारी पडल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दूषित पाण्यामुळे परिसरातील अनेक मुलांचे आरोग्य बिघडले असल्याचे सामोरे आले आहे. सध्या पाणीपुरवठा वेळेवर आणि मुबलक होत नसल्याने विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. वॉर्ड क्र. 21 मध्ये येणाऱ्या मारुती गल्ली खासबाग परिसरातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. या परिसरातील ड्रेनेजचे काम 3 महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते. ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झाले आहे. पण उर्वरित काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कंत्राटदारांकडे तक्रार करूनही हे काम पूर्ण करण्यात आले नाही. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनीदेखील निवडणुकीचे कारण दाखवून कानाडोळा केला आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. सांडपाणी साचून विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाझरत आहे. त्यामुळे पाणी दूषित बनले आहे. पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने सर्रास रहिवासी कूपनलिका आणि विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. मात्र यामुळे मुलांना इन्फेक्शन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील गटारी गेल्या कित्येक महिन्यापासून स्वच्छ करण्यात आल्या नाहीत. महापालिकेकडून कचऱ्याची उचल करण्यासाठी आणि गटारी स्वच्छ करण्याकरीता कंत्राट दिले जाते. पण प्रत्यक्षात कंत्राटातील अटीनुसार स्वच्छतेची कामे होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष देवून आवश्यक कारवाई करावी, तसेच येथील अर्धवट काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.









