रामलिंगखिंड गल्लीतील समस्या : आरोग्याच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ
प्रतिनिधी /बेळगाव
रामलिंगखिंड गल्लीतील पाटील हॉस्पिटल परिसरात मागील 8 ते 9 महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रार करूनदेखील दखल घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. दुरुस्तीऐवजी कारणे सांगून या समस्येचे निवारण करण्याकडे कानाडोळा केला आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
रामलिंगखिंड गल्लीचा परिसर शहरातील मध्यवर्ती भाग असून येथील समस्यांकडे महापालिका आणि एलअॅण्डटी कंपनीने दुर्लक्ष केले आहे. कोनवाळ गल्लीतील पाणी समस्येचे निवारण करण्यास एलअॅण्डटी कंपनी अपयशी ठरली आहे. मात्र आता शहरातील विविध भागातून पाणीपुरवठा संदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
अरुंद रस्त्यांमुळे टँकर थांबविणे अशक्य
या परिसरातील रस्ते अरुंद असल्याने पाण्याचा टँकर थांबविणे अशक्य आहे. पण टँकरने किती दिवस पाणीपुरवठा करणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे जलवाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी एलअॅण्डटी कंपनीकडे सातत्याने केली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील एका कुटुंबातील लहान मुलाला पाण्यामुळे आरोग्याचा तक्रारी निर्माण झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. दूषित पाण्यामुळे मुलाचे आरोग्य बिघडले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत असून तक्रार करूनही दखल घेण्यात आली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याला एलअॅण्डटी कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिका आणि एलअॅण्डटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.
8 ते 9 महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा…
रामलिंगखिंड गल्ली येथील पाटील हॉस्पिटलसमोरील काही नळांना दूषित पाणी येत आहे. पाण्यामध्ये धूळीचे कण तसेच फेस येत असल्याने याबाबत एलअॅण्डटी कंपनीकडे सातत्याने तक्रार करण्यात येत आहे. दूषित पाण्याचा पुरवठा मागील 8 ते 9 महिन्यांपासून होत असून याबाबत सातत्याने तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेवून एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पण समस्येचे निवारण केले नाही. येथील जलवाहिन्या खराब झाल्या असल्याचा संशय नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला. तसेच येथील जलवाहिन्या बदलण्याची विनंती एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली. पण याची दखल घेतली नाही. जलवाहिन्या बदलण्यासाठी रस्त्याची खोदाई करावी लागणार असून महापालिकेकडून परवानगी मिळत नसल्याचे कारण देण्यात आले. तसेच टँकरने पाणीपुरवठा करू, असे सांगून अधिकाऱ्यांनी समस्येचे निवारण करण्याबाबत जबाबदारी झटकली आहे.









