वारंवारच्या अपघातांमुळे नाराजी : तोडगा काढण्याची मागणी
बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट येथे बुधवारी पहाटे एक कंटेनर उड्डाणपुलाखाली अडकल्याची घटना घडली. पहाटेच्यावेळी उंचीचा अंदाज न आल्याने कंटेनरचालकाने उड्डाणपुलाखालून कंटेनर आत घातला. परंतु, उड्डाणपुलाच्या स्पॅनला धडकला आणि एका बाजूला कलंडला. सुदैवाने कंटेनर पलटी होण्यापासून बचावला असला तरी असे प्रकार वारंवार घडत असून यातून तोडगा काढणे गरजेचे आहे. तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे काम अद्याप बाकी आहे. एका बाजूचा उड्डाणपूल पूर्ण झाला असला तरी दुसऱ्या बाजूचे काम अर्धवट आहे. निधीअभावी उड्डाणपुलाचे काम रखडल्याचे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. काँग्रेस रोडवरून येणारी अवजड वाहतूक उड्डाणपुलाखालून खानापूर रोडला जोडण्यात आली आहे. परंतु, उड्डाणपुलाखाली उंची कमी असल्याने बऱ्याच वेळा कंटेनर उड्डाणपुलाला धडकत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे एक कंटेनर धडकून एका पिलरचे नुकसान झाले होते. अरुंद रस्ता असल्यामुळे आधीच वाहतूक कोंडी होत असताना असे कंटेनर अडकल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. बुधवारी पहाटे देखील असाच प्रकार घडला. काळोखात उड्डाणपुलाचा अंदाज न आल्याने कंटेनरचालकाने उड्डाणपुलाखालून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी समोरच्या स्पॅनला जोरदार धडक बसली व कंटेनर बाजूला कलंडला. अवजड वाहने ये-जा करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने असे अपघात वरचेवर होत आहेत. दिवसा उड्डाणपुलाची उंची लक्षात आल्याने बरेच कंटेनरचालक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वाहने घेऊन जातात. परंतु, रात्रीच्या वेळी असे अपघात होत आहेत. यामुळे उड्डाणपुलाला देखील धोका निर्माण झाला आहे.









