नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या संसर्गजन्य ‘आय फ्लू’ची साथ सुरू झालेली आहे. पूरजन्य परिस्थिती आणि बदलते हवामान यामुळे ही साथ फैलावत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच पालकांनी याबाबत आपल्या मुलांना योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन नवी दिल्लीच्या एम्स सेंटरने केले आहे. लक्षणे-या आय फ्लूमुळे डोळे लाल होणे, पापण्यांना सूज येणे, तसेच खाज येणे, डोळ्यांमधून पिवळ्या रंगाचे पाणी वाहणे, पापण्या चिकटणे अशी लक्षणे आढळतात. लहान मुलांना कदाचित ताप येऊ शकतो.
उपचार-डोळे स्वच्छ करण्यासाठी आय वाईप्सचा वापर करावा. डोळे चोळू नयेत. संरक्षक गॉगल्स घालावेत. कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नयेत. कोणतेही घरगुती उपचार डोळ्यांवर करू नयेत. कोणतेही आयड्रॉप्स वापरण्यापूर्वी नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. दृष्टीला अंधूकसे दिसू लागत असेल तर ताबडतोब नेत्रतज्ञांकडे तपासणी करून घ्यावी. खबरदारीचे उपाय-आपले हात सतत सॅनिटायझर किंवा साबणाने धुवावेत. डोळ्यांना सतत हात लावू नये. आय फ्लू झालेल्या व्यक्तीचे रुमाल, बेडशीट किंवा टॉवेल्स इतरांनी वापरू नयेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच पोहणे टाळावे.









