नीतेश राणेंनी सिंधुदुर्गात आपत्कालीन स्थितीबाबतची आढावा बैठक घेतली
ओरोस : आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन आता अलर्ट मोडवर असून नागरिकांनी आपत्कालीन समस्या निवारणासाठी संबंधित विभागांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. अथवा संबंधित अधिकाऱ्यांना थेट कॉल करावा. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास पालकमंत्री या नात्याने आपल्याला कॉल करावा, असे आवाहन पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हावासीयांना केले आहे.
या परिस्थितीत सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून ते नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दक्षिण कोकण किनाऱ्यालगत पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मागील चार ते पाच दिवस सिंधुदुर्गात पूर्व मोसमी पाऊस पडत आहे.
विजांचा लखलखाट, गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मे महिन्यातच पावसाळी वातावरण निर्माण झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत शनिवारी पालकमंत्री श्री. राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन सभागृहात आपत्कालीन स्थितीबाबतची आढावा बैठक घेतली.
त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी उपस्थित होते.
प्रशासन कुठे कमी पडतय, हे लक्षात आलं!
आपत्कालीन परिस्थितीमुळे यावर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्याने प्रशासन कुठे कमी पडतय, हे लक्षात आलं आहे. त्या अनुषंगाने काय सुधारणा करण्याची गरज आहे, हेही लक्षात आलं आहे. वीज, वाहतूक, रस्ते, दरड कोसळणे, मोबाईल नेटवर्क आणि झाडे पडणे अशा समस्या या परिस्थितीत प्रामुख्याने उद्भवल्या आहेत. समस्या निवारणाचे काम सुरू आहे. मात्र तरीही संबंधित यंत्रणेकडे याबाबतची उत्तरे मागितली आहेत. सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
मेन्टेनन्सची कामे एप्रिलमध्येच पूर्ण हवीत!
खरं तर पावसाळ्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय नागरिकांना सेवा पुरवता यावी, यासाठी झाडे कापणे, वीज, रस्ते, वाहतूक याबाबतची मेन्टेनन्सची कामे एप्रिल महिन्यातच पूर्ण होणे आवश्यक असल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. त्या अनुषंगाने पुढील वर्षीपासून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मेन्टेनन्सची ही सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
सर्व संबंधित कामे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्ण व्हावीत, यासाठी वेळापत्रक तयार करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. त्यानुसार ही कामे पूर्ण केली जातील. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे व राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वीज वितरणच्या समस्या निवारणासाठी स्वतंत्र पॅकेज!
जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता आपल्याला सुरळीत वीज वितरणासाठी स्वतंत्रपणे काम करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू असून ते डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र तरीही विजेची समस्या वारंवार उद्भवू नये, यासाठी कराव्या लागणाऱ्या सुधारणांबाबतची माहिती आणि आवश्यक निधीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते जे बजेट देतील तेवढा निधी मंजूर करून आणला जाईल आणि जिल्हावासीयांना भेडसावणारा विजेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही श्री. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
वीज वितरण, बीएसएनएलची पुढील आठवड्यात खास बैठक
वीज आणि माबाईल नेटवर्क यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या अनुषंगाने या दोन्ही विभागांच्या जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक बोलावली आहे. त्यावेळी त्यांच्याकडून समस्या व उपाय यांच्यावर चर्चा करून योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही वर्षांची नुकसान भरपाई एकत्र देण्याचा प्रयत्न
यावर्षी पूर्व मासमी पावसामुळे झालेले नुकसान आणि गतवर्षीच्या पूरकालीन परिस्थितील नुकसान याबाबतची भरपाई एकत्रित देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लवकरच याबाबतचा निर्णय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
केबिनमध्ये बसून नागरिकांना प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणोची कल्पना अधिकाऱ्यांना येणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रजेवर गेलेल्या सर्वच अधिकाऱ्यांच्या रजा आपत्कालीन परिस्थितीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.
परिस्थिती नियंत्रणात येईपर्यत कुठल्याही अधिकारी, कर्मचाऱ्याला रजा दिली जाणार नाही. जनतेच्या सेवेसाठी ते उपलब्ध असतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अडचणींबाबत हेल्पलाईनवर संपर्क साधावा अन्यथा अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. प्रतिसाद न मिळाल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. राणे यांनी केले.








