ऑनलाईन बिल पेमेंट बंद केल्याचा परिणाम : हेस्कॉमची वेबसाईट ठरतेय कुचकामी
बेळगाव : हेस्कॉमने गुगल पे, फोन पे यासारख्या मोबाईल वॉलेटमधून बिल भरण्याची सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद केली आहे. परंतु याचा परिणाम ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, बिल भरण्यासाठी हेस्कॉमच्या बिल भरणा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे बंद झालेली सेवा लवकर सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. ग्राहकांना घरबसल्या विद्युतबिल भरता यावे, या उद्देशाने पेटीएम, गुगल पे, फोन पे, अमॅझोन पे या माध्यमातून बिल भरता येत होते. परंतु तांत्रिक अडचण असल्याचे कारण देत हेस्कॉमने तात्पुरत्या स्वरुपात ही सेवा बंद केली आहे. केवळ बेळगावमध्ये ऑनलाईन बिल भरणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यामुळे या सर्व ग्राहकांना फटका बसला असून, बेळगाव वन तसेच हेस्कॉमच्या कार्यालयात जाऊन बिल भरण्याची वेळ आली आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून डिजिटल इंडियासाठी प्रयत्न केले जात असताना ऑनलाईन सुविधा हेस्कॉमकडून बंद केल्या जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सध्या बेळगाव वन कार्यालयामध्ये घरपट्टी भरणाऱ्यांची मोठी गर्दी असल्याने त्यात वीजबिल भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
ऑनलाईन सुविधा बंदमुळे समस्या
मोबाईल वॉलेटमधून बिल भरण्याची सुविधा बंद झाली असल्याने हेस्कॉमने आपल्या वेबसाईटवरून ग्राहकांना बिल भरण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात मात्र हेस्कॉमची वेबसाईट लवकर सुरू होत नसून बिल भरण्यास बराच कालावधी लागत आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना काही बँकांकडून अधिकची रक्कम घेतली जात असल्याचे प्रकार समोर आल्याने यापेक्षा कार्यालयात जाऊन बिल भरलेले बरे, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.
वीज समस्यांसाठी हेल्पलाईन
हेस्कॉमने ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी 1912 ही तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू केली आहे. विजेसंदर्भात कोणत्याही तक्रारी या क्रमांकावर मांडल्या जाऊ शकतात. ग्राहकांच्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून त्या तात्काळ निवारण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचबरोबर बेळगावसह खानापूरमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले असून, त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करणे सोयीचे होणार आहे. हेस्कॉमने विभागवार साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले असून, ग्राहकांनी आपल्या तक्रारी या क्रमांकावर मांडायच्या आहेत.









