वृत्तसंस्था / बीजिंग
गलवान येथे भारत आणि चिनी सेनांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर चीनने अक्साई चीन भागात बंकर्स आणि बोगदे यांची बांधकामे करण्यास प्रारंभ केला आहे, असे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अक्साई चीन हा लडाखचाच भाग असून त्यावर कायदेशीरदृष्ट्या भारताचा अधिकार आहे. मात्र, चीनने तिबेट ताब्यात घेतल्यानंतर लडाखचाही प्रदेश गिळंकृत करण्यास प्रारंभ केला होता. 1962 च्या युद्धात भारताला नामुष्कीकारक पराभव स्वीकारावा लागला. तोपर्यंत चीनने लडाखचा 60 हजार चौरस किलोमीटरहून अधिक प्रदेश बळकावला होता. तेव्हापासून चीनने अक्साई चीनमध्ये सैन्य आणले आहे.
चीनने नुकताच आपला नकाशा प्रसिद्ध केला असून त्यात अरुणाचल प्रदेश आणि लडाख आपल्या देशात दाखविले आहेत. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चीनची ही कृती हास्यास्पद ठरविली आहे. भारताची अशा प्रकारे कुरापत काढण्याची चीनची ही जुनी सवय आहे. तथापि, कोणीही आपल्या नकाशात दुसऱ्या देशाचा प्रदेश दाखविला म्हणून सत्य परिस्थितीत कोणताही फरक पडत नाही. असे हास्यास्पद प्रकार करुन कोणीही आपली भूमी वाढवू शकत नाही, असे प्रतिपादन करत त्यांनी चीनची कृती निरर्थक ठरविली आहे.
लडाखचा इतिहास प्राचीन
लडाखला प्राचीन इतिहास आहे. अनेक हजार वर्षांपासून हा हिमालयाचा प्रदेश काश्मीर भागाशी जोडला गेला आहे. याची संस्कृतीही भारतीयच आहे. तथापि, चीनने या प्रदेशावर दावा सांगण्यास काही दशकांपूर्वीपासून प्रारंभ केला. लडाख आणि चीन यांची संस्कृती एक असल्याने हा आमचाच भाग आहे असे चीनचे म्हणणे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळी चीनने लडाखच्या काही भागावर बेकायदा ताबा मिळविला होता. 1947 नंतर त्यावेळच्या भारत सरकारच्या दुर्लक्षामुळे चीनने हळूहळू लडाखमध्ये घुसखोरी केली. 1962 च्या युद्धात त्याने 45 हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश बळकावला, असे तज्ञांचे मत आहे.









