Sangli News : अनेक सवलतीपासून वंचित असलेल्या बांधकाम कामगारास वर्षातून एकदा येणारा दिवाळी सण साजरा करण्यासाठी दिवाळी बोनस जाहीर करून त्वरित देण्यात यावा. अन्यथा सोमवार १७ ऑक्टोबर रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय गुदगे व संपर्क प्रमुख प्रशांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी गणेश कुचेकर, समाधान बनसोडे, संजय कांबळे, लक्ष्मण सावरे, फरजाना नदाफ, भारत कोकाटे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
गुदगे व वाघमारे म्हणाले, दिवाळी सणावेळी बांधकाम कामगारांना आपल्या कुटुंबाला नवीन कपडे घेणे, गोडधोड पदार्थ करणे व आनंदोस्तव उत्साहात साजरा करण्यासाठी यंदा तरी महाराष्ट्र शासनाने नोंदीत कामगारांना १०,००० रुपये दिवाळी बोनस द्यावा. तो दिवाळी अगोदर प्रत्येक कामगाराच्या खात्यावर जमा करावा. ही आर्थिक मदत १४ ऑक्टोबरपर्यंत द्यावी.
तसेच 2015 नंतर बंद केलेली मेडिक्लेम योजना पुन्हा सुरू करण्यात यावी. कोल्हापूर जिल्ह्यासाठी पूर्णवेळ सहाय्यक कामगार आयुक्त यांची नेमणूक करण्यात यावी, बांधकाम कामगारांना ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा ५००० रुपये पेन्शन सुरू करावी, कामगारांच्या वयोगटातील अट काढून टाकावी व सर्व वयोगटातील कामगारांचा मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना २ लाख रुपये मिळालेच पाहिजेत, अशा आमच्या प्रलंबित सर्व मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात. अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
Previous Articleलैला शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु
Next Article पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढीविरोधात बेमुदत उपोषण








