कोल्हापूर :
बांधकाम कामगारांची नावनोंदणी, नूतनीकरण पुर्वी पोर्टलवर घरबसल्या होत होती. परंतू सरकारने पोर्टल बंद करून कामगार नोंदणीसाठी सेतू केंद्र उभारून त्याचा ठेका खासगी कंपन्यांना दिला आहे. एका तालुक्याला एकच सेतू केंद्र असल्याने सेतू केंद्रावर नावनोंदणीसाठी रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. जवळपास तीनशे ते चारशे कामगार हांथरून–पांघरून घेवूनच मार्केट यार्डात पोहचले होते. ही रांग पाहून अर्ज भरून देण्यासाठी सेतू केंद्राच्या एजंटांचा येथे सुळसुळाट असल्याचे कामगारांचे म्हणने आहे. रात्री–अपरात्री कामगारांना येथे काय झाल्यास याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचे कामगारांचे म्हणने आहे.
सरकारने बांधकाम कामगार पोर्टलवर घरबसल्या मोबाईलवरून नोंदणी करीत होते. किंवा बांधकाम कामगारांच्या संघटनाही आपल्या संघटनेच्या कामगारांना अर्ज भरून देत होते. परंतू बांधकाम कामगार महामंडळाच्या पैशाची उधळपट्टी करून एजन्सी पोसण्यासाठी सरकारने सेतू केंद्र उभारून एजन्सीला अर्ज भरण्याचा ठेका दिला आहे. पोर्टल बंद केल्याने सेतू केंद्राशिवाय बांधकाम कामगारांना पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आपली नावनोंदणी, नूतनीकरण आणि मेडिक्लेम नोंदणी करण्यासाठी कामगार धडपडत आहेत. सेतू केंद्रावर दररोज फक्त नोंदणी 50, नूतनीकरण 50 आणि मेडिक्लेम 50 असे 150 अर्ज भरण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यातही एजंटगिरी सुरू असल्याने कामगारांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. करवीर तालुक्यातील सेतू केंद्रावर नोंदणी करण्यासाठी राधानगरी, कागल, गगनबावडा, पन्हाळा, शाहुवाडी येथील कर्मचारी आले आहेत. मार्केड यार्डात महिला रात्रीपासून वस्तीला येत असल्याने त्यांच्या जीवास धोका आहे. या महिलांना काय झाले तर सरकार आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जबाबदार असेल, असे कामगारांचे म्हणने आहे. त्यामुळे सरकारने सेतू केंद्र बंद करून पुर्वीप्रमाणे पोर्टलवर नावनोंदणी सुरू करावी, अशी मागणीही कामगार करीत आहेत. रविवारी रात्रीपासून वस्तीला आलेल्या कामगारांना थंडीचा सामना करावा लागलाच, परंतू अन्न किंवा पाणीदेखील मिळाले नसल्याचे महिलांनी सांगितले.
- सेतू केंद्रावर दोन रांगा
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी सेतू केंद्राच्याबाहेर दोन रांगा लागल्या आहेत. एक रांग एजंटांची आणि दुसरी रांग सर्वसामान्य बांधकाम कामगारांची आहे. सर्वसामान्य बांधकाम कामगारांची नोंदणी थांबवून येथील अधिकारीही एजंटांनी दिलेल्या अर्जातील नावांचीच नोंदणी करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य कामगार करीत आहेत. त्यामुळे यावर सरकार काय तोडगा काढणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- सेतू केंद्राव्दारे कामगारांची पिळवणूक
बांधकाम कामगार नावनोंदणीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून वस्तीलाच आले होते. येथे मात्र त्यांची कोणीही दखल घेत नसून सेतू केंद्राच्या एजंटांकडून बांधकाम कामगारांची पिळवणूक केली जात आहे. अर्ज भरून द्यायला 500 रूपयांची मागणी केली जात आहे. तर भरलेला अर्ज नोंदवून घ्यायला सेतू केंद्रातील अधिकारी 4 ते 5 हजार रूपये घेत आहेत. मग सरकारने बांधकाम कामगारांना न्याय देण्याच्या नावाखाली एजंटांसह आपली तुमडी भरण्यासाठी आर्थिक पिळवणूक केली जात आहे.
अमोल कुंभार (श्रमिक बांधकाम कामगार कृती समिती)
- एजंटांकडून शटर बंद
एजंटांनी भरलेल्या अर्जाचीच नोंदणी झाली पाहिजे, यासाठी एजंटांनी सेतू केंद्राचे शटर बंद केले. एजंटांची वेगळी लाईन करून त्यांचीच नोंदणी सुरू आहे. आम्ही रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून थांबूनही आमची सेतू केंद्रातर्फे दखल घेतली नाही. सर्वसामान्य बांधकाम कामगारांच्या एकाही अर्जाची नोंदणी केली नाही
विक्रम कुरणे (बांधकाम कामगार)
- तीनच कॉम्प्युटर ऑपरेटर
सेतू केंद्राच्या माध्यमातून दिवसभरात फक्त दीडशे अर्ज भरण्यास परवानगी आहे. त्यात शेकडो कर्मचारी आणि फक्त तीनच कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत. तसेच बांधकाम कामगार संघटना आमच्याच लोकांची नोंदणी करावी, यासाठी अग्रही आहेत. त्यामुळे सेतू केंद्रावर गर्दी वाढत आहे. डिसेंबरपासून आजतागायन दीड लाखांपैकी 1 हजार 209 मेडिक्लेम केले. 621 अर्जाचे नूतनीकरण आणि 318 अर्जांची नोंदणी केली आहे.
प्रियांना शेळके (प्रमुख, करवीर तालुका सेतू केंद्र)








