कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याची मागणी बांधकाम कामगारांनी दिवाळीपूर्वी केली होती. पण कामगारांना दिवाळी बोनस मिळाला नाही. मात्र तत्कालीन कामगार मंत्र्यांनी सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन बांधकाम कामगारांना दिले होते. काही महिन्यानी दिवाळी जवळ आली तरी कामगारांना सानुग्रह अनुदान मिळाले नाही. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने फसवल्याची भावना निर्माण झाली आहे.
बांधकाम कामगारांसाठी राज्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळ कार्यरत आहेत.या मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.बांधकाम साहित्य, संसारपयोगी संच दिले जातात. कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिले जाते. कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात. या योजनांचा बांधकाम कामगारांना लाभ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन लाख बांधकाम कामगारांची नोंद असून ते लाभ घेत आहेत.
दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस मिळावा अशी मागणी बांधकाम कामगार संघटना काही वर्षापासून करत आहेत. यासाठी कामगार संघटनांनी कामगार आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे, आंदोलने केली आहेत. कामगार मंत्र्यांच्या निवासस्थानावरही मोर्चा काढला होता. त्यावेळी शिष्टमंडळांबरोबर झालेल्या चर्चेत बोनस ऐवजी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. पण तोपर्यंत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली आणि बांधकाम कामगारांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा मागे पडला. यामुळे कामगारांची दिवाळी सानुग्रह अनुदानाशिवाय झाली.
निवडणूक झाल्यानंतर लवकर सानुग्रह अनुदान मिळेल अशी कामगारांना अपेक्षा होती. पण अद्याप तरी अनुदान मिळण्याच्या हालचाली दिसत नाहीत. आता दुसरी दिवाळी जवळ आली तरी अनुदान मिळण्याची चर्चाच नाही. यामुळे कामगारांसह संघटनांमध्ये अस्वस्था आणि नाराजी आहे.
दरम्यान, बांधकाम कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यमान कामगार मंत्र्यांची भेट घेऊन सानुग्रह अनुदान देण्यासह कामगारांच्या अन्य प्रश्नांवर चर्चा केली होती.त्यावेळी या चर्चेत कामगार मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करुन सानुग्रह अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही आतापर्यंत याबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत.
- सानुग्रह अनुदान विचाराधीन होते.
बांधकाम कामगारांनी दिवाळी बोनस देण्याची मागणी केली होती. यासाठी दिवाळीत बांधकाम कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चाही झाल्या. त्यावेळी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र याबाबत शासन आदेश झाला नाही.यामुळे ते मिळणार नाही.
विशाल घोडके– सहायक कामगार आयुक्त








