शासनाच्या सुविधा पुरविण्याची वारंवार मागणी : बांधकाम कामगारांतून नाराजी
बेळगाव : बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या शासनाच्या सुविधा बंद झाल्या आहेत. त्यामुळे कामगारांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. विशेषत: बांधकाम कामगारांच्या मुलांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती मागील दोन वर्षांपासून बंद झाली आहे. त्याबरोबर कामगारांना मिळणारी मोफत बसपास सुविधाही थांबली आहे. याबाबत बांधकाम कामगारांनी कामगार खात्याकडे सातत्याने निवेदन आणि तक्रारी दिल्या आहेत. मात्र अद्याप कामगारांना सुविधा पुरविण्याकडे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.
जिल्ह्यात 2 लाख 30 हजारांहून अधिक नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. या कामगारांना मोफत बसपास, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती आणि मुलांच्या विवाहासाठी अनुदान दिले जात होते. मात्र या सर्व सुविधा थांबल्या आहेत. परिणामी कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक जीवनही संघर्षमय सुरू आहे. बांधकाम कामगारांना मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करावी लागते. यावरच त्यांचा संसाराचा गाडा चालतो. मात्र आता शासनाकडून सुविधा थांबल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
बांधकाम कामगारांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मोफत बसपासची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात 10 हजार कामगारांना बसपासचे वितरण करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर मोफत बसपासची सुविधा बंद झाली आहे. त्याबरोबर मुलांना शिष्यवृत्ती दिली जात होती. मात्र ही शिष्यवृत्तीदेखील आता मागील काही दिवसांपासून थांबविण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. मागील सरकारने मोठा गाजावाजा करून बांधकाम कामगारांना मोफत बसपासची सुविधा सुरू केली होती. मात्र ती काही दिवसांतच धुळीस मिळाली. त्यामुळे आता काँग्रेस सरकार या सुविधांकडे लक्ष देणार का? असा प्रश्नही कामगारांना पडू लागला आहे.
बांधकाम कामगार अडचणीत
बांधकाम कामगारांना देण्यात येणारी मोफत बसपास सुविधा बंद झाली आहे. याचबरोबर मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती व विवाहासाठी देण्यात येणारे अनुदानही थांबले आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत मंत्री, अधिकारी आणि कामगार खात्याकडेही तक्रारींचे निवेदन सादर करण्यात आले.
– अॅड. एन. आर. लातूर-जिल्हा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष









