वार्ताहर/हिंडलगा
आंबेवाडी ते कडोली हा रस्ता अत्यंत जवळचा संपर्क रस्ता असून कडोली भागातील विविध गावांना जाण्यासाठी तसेच आंबेवाडी भागातील विविध गावांना जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. हा रस्ता एक वर्षापूर्वी केलेला असून या रस्त्यावरच एक वर्षापूर्वी मोरीचे बांधकाम (सी.डी.वर्क) करण्यात आले आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नेहमी वाहनांची वर्दळ असते. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने देखील या रस्त्यावरून येत जात असतात. कडोली भागातील अगसगा, हंदीगनूर, मण्णिकेरी व आंबेवाडी भागातील मण्णूर, सुळगा, हिंडलगा या गावांना जवळचा रस्ता आहे. या रस्त्यामुळे प्रत्येक गावचे अंतर तीन ते चार किलोमीटरने कमी होते. या भागातील शेतकरी वर्गालादेखील या रस्त्याचा मोठा उपयोग होतो. परंतु रस्त्यात बांधण्यात आलेली मोरी निकृष्ट दर्जाची असल्याने लहान मोठे अपघात होत आहेत. वाहनांचेदेखील नुकसान होत आहे. रात्रीच्यावेळी दुचाकी, चारचाकी वाहनांना अपघात होऊ नये म्हणून जाणकार व्यक्तीनी त्या ठिकाणी धोका असल्याचे समजण्यासाठी लाल कापड बांधून बांबू उभारला आहे. तरी या भागातील नागरिकांची एकच मागणी आहे. ज्या ठेकेदाराने हे बांधकाम केले आहे त्याच्याकडूनच हे दुऊस्तीचे काम करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.









