बांधकामाबाबतचा नवीन आराखडा पुन्हा पाठवून देण्याची सूचना
बेळगाव : हिरेबागेवाडी येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इमारतीचे बांधकाम समाधानकारक नसल्याने उच्चशिक्षण मंत्री एम. सी. सुधाकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बांधकामाबाबतचा नवीन आराखडा पुन्हा पाठवून देण्याची सूचना त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. एम. सी. सुधाकर व महिला-बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुवारी विद्यापीठाच्या बांधकामाची पाहणी केली. हे बांधकाम गुणवत्तापूर्ण झाले नसून पुढील बांधकाम करताना लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी सल्लामसलत करा व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू करा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, यापूर्वीच्या सरकारच्या राजवटीत अत्यंत घाईघाईने बांधकाम सुरू करण्यात आले. याचवेळी या भागातील शेतकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी सुधाकर यांना निवेदन देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व हा प्रकल्प लवकर कार्यान्वित करावा, अशी मागणी केली. दरम्यान, आरसीयुचे कुलगुऊ विजय नागण्णावर यांनी या इमारतीचे बांधकाम आणि हा प्रकल्पच अवैज्ञानिक आहे. कारण व्यावसायिक संकुले बांधणाऱ्या कंत्राटदाराला याचे काम देण्यात आले आहे. ज्याला शैक्षणिक संस्था, वर्ग, मिटिंग हॉल, चेंबर आदी बांधकामाचा दृष्टिकोन नाही. त्यामुळे हे काम समाधानकारक नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.









