न्यासाचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली माहिती : सर्व आव्हानांवर केली मात
वृत्तसंस्था/ अयोध्या
उत्तरप्रदेशच्या अयोध्येत सुरु असलेले राम मंदिर उभारणीचे कार्य 5 जून रोजी पूर्ण होणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या निर्मिती समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी याची मंगळवारी माहिती दिली आहे. राम मंदिर उभारणीदरम्यान उद्भवलेल्या सर्व आव्हानांवर टीमवर्कद्वारे मात करण्यात आली आहे. आम्ही दरदिनी आव्हानांचा सामना करतो आणि त्यावर तोडगाही काढतो असे मिश्र यांनी म्हटले आहे.
आर्थिक अडचणी न येऊ देणाऱ्या न्यासाचे मी आभार मानू इच्छितो. इंजिनियरिंग आणि डिझाइन एक आव्हान होते, कारण पुढील एक हजार वर्षांपर्यंत कुठल्याही प्रकारची आपत्ती झेलू शकेल असे मंदिर उभारण्याचे स्वप्न होते असे मिश्र यांनी म्हटले आहे.
मंदिर परिसरात महर्षि वाल्मिकी, वशिष्ठ, निषादराज महाराज, अहिल्या माता, शबरीमाता आणि अगस्त्य मुनी यांचे मंदिर देखील 5 जूननंतर सर्वसामान्य लोकांसाठी खुले केले जाणार आहे. राम दरबार आणि मंदिर परिसरात उभारलेल्या 6 मंदिरांमध्ये 5 जून रोजी पूजा केली जाणार आहे. चंपत राय हे 5 जून रोजीच्या विस्तृत कार्यक्रमाची घोषणा करतील. राम मंदिराचे स्वप्न साकार होण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. राम मंदिर उभारणी पूर्ण झाल्याच्या दिवशी म्हणजेच 5 जूनच्या एक किंवा दोन दिवसांनी भाविक परिसरातील सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊ शकतात असे मिश्र यांच्याकडून सांगण्यात आले.
शिखरावर 42 फूट उंच ध्वज दंड
अयोध्येत मंगळवारी राम मंदिराच्या मुख्य शिखरावर ध्वज दंड स्थापित करण्यात आला. याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या अधिकृत सोशल मीडिया अकौंटवरून देण्यात आली. कार्यक्रमाची काही छायाचित्रेही शेअर करण्यात आली आहेत. शिखर कलशासह मंदिराची उंची 161 फूट असून यात 42 फूटांचा ध्वज दंड जोडण्यात आला आहे.









