कार्यकर्त्यांकडून मंडप उभारणीसाठी साहित्याची जुळवाजुळव सुरू
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी केली जात आहे. बेळगावमधील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंडप उभारण्याची मुहूर्तमेढ करून उभारणीला सुरुवातदेखील केली आहे. यामुळे गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये 370 हून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. धार्मिक सणांना सामाजिक रूप देत अनेक देखावे सादर होतात. केवळ बेळगावच नव्हे तर चंदगड, खानापूर, संकेश्वर या भागातूनही शेकडो भाविक बेळगावमध्ये दाखल होत असतात. गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने मूर्तीशाळांमध्ये गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लगबग सुरू आहे. दिवसरात्र गणेशमूर्तींना रंगकाम व गणेशमूर्तींची सजावट सुरू आहे. गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक मंडळांनी मुहूर्तमेढ केली आहे. काही गणेशोत्सव मंडळे आगमन सोहळा आयोजित करणार असल्याने मंडप उभारणीचे काम सुरू आहे. काही गणेशोत्सव मंडळे नारळी पौर्णिमा अथवा गोकुळाष्टमीदिवशी मुहूर्तमेढ करून मंडप उभारणीला सुरुवात करणार आहेत. मंडप उभारणीसाठी कार्यकर्त्यांकडून साहित्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
मूर्तिकारांची लगबग
बेळगावमधील मूर्तींना गोवा, चंदगड, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज, हुबळी, धारवाड, हल्याळ येथूनही मागणी असल्याने सार्वजनिक मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे रात्रीच्यावेळीही कार्यशाळा गजबजू लागल्या आहेत. गणेश चतुर्थीदिवशी होणारी गर्दी पाहता त्यापूर्वीच परगावी गणेशमूर्ती घेऊन जाणार असल्याने वेळेत मूर्ती तयार करण्यासाठी लगबग सुरू आहे.









