-कागलमधील बेकायदा लॉजिस्टिक पार्कचे बांधकाम हसन मुश्रीफांनी बंद पाडले
–उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार
Kagal : कागलमध्ये लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम आमदार हसन मुश्रीफ यांनी बंद पाडले. कागल-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर श्री. लक्ष्मीदेवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस उंच डोंगरावर हे काम सुरू होते. नगरपालिकेच्यावतीने दोन नोटीसा देऊनही ही कंपनी ऐकत नव्हती. बेकायदेशीररित्या वन विभागाची जमीन खोदून हजारो झाडांची कत्तल केली जात आहे, तरीही फॉरेस्टवाले झोपलेत काय? असा सवाल सवाल मुश्रीफ यांनी विचारला. यावेळी केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नगरपालिका पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक संजय ठाणेकर, इरफान मुजावर आदी उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी, कागलमध्ये लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली बेकायदेशीर बांधकाम सुरु करण्यात आले आहे. बांधकामासाठी परवानगी न घेता बांधकाम केल्याप्रकरणी याआधी कंपनीला दोन नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही कंपनीने काम सुरुचं ठेवले. आज अखेर बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी आमदार हसन मुश्रीफ यांनी भेट देत हे बांधकाम बंद पाडले. यावेळी वनविभागाला जबाबदार धरत फॉरेस्टवाले झोपलेत काय? असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा- शरद पवारांनी सांगितलं तर उद्धव ठाकरे काँग्रेसच्या डायसवर देखील बसतील-चंद्रशेखर बावनकुळे
उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार
यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की , लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली येथे भले मोठे गोडाऊनचे बांधकाम सुरू आहे.येथून सांडपाणी कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावात येऊन संपूर्ण कागल शहराचे पिण्याचे पाणीही दूषित होणार आहे.ही जागा पंचतारांकित एमआयडीसीची असूच शकत नाही.कोणतीही परवानगी न घेता हे मोठे बांधकाम सुरू आहे.फॉरेस्टवाले साधी पिण्याच्या पाण्याची पाईप घातली तरी अडवतात. इथे मात्र रस्त्यासाठी जमीन खोदून हजारो झाडे तोडली तरीही ते झोपलेत काय?असा सवालही मुश्रीफ यांनी केला.याबाबत सखोल चौकशी झालीच पाहिजे.या बांधकामाविरोधात कोल्हापूर जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.









