कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीला मोर्चाद्वारे ग्रामस्थांचे निवेदन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कॉम्प्युटर उतारा काढून गौंडवाड गावातील देवस्थानच्या वादग्रस्त जागेमध्ये घरे बांधण्यास ग्रामपंचायतीकडून परवानगी देण्यात येत आहे ते त्वरित थांबवावे अशा मागणीचे निवेदन गौंडवाड गावातील देवस्थान पंच कमिटी, महिला व ग्रामस्थांनी कंग्राळी ग्रा. पं. ला मोर्चाद्वारे दिले. गौंडवाड गावातील देवस्थान जमिनीमध्ये काही लोक पंचायतीकडून कॉम्प्युटर उतार काढून या जागेमध्ये घरे बांधण्यासाठी पंचायतीकडून परवानगी मिळवत आहेत. हे चुकीचे आहे. या जागेचा ग्रा. पं. ने कॉम्प्युटर उतारा देऊ नये तसेच घरे बांधण्यास परवानगीही देऊ नये असे निवेदनात म्हटले आहे.
…तर पोलीस कारवाई करणार
यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा कौसरजहाँ सय्यद यांच्याकडे गौंडवाड देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून, अध्यक्षा कौसरजहाँ सय्यद म्हणाल्या, आम्ही कायद्यानुसार त्याना नोटीस पाठविणार असून, नोटीस काढूनही त्यानी ऐकले नाही तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी ग्रा. पं. सदस्य बंदेनवाज सय्यद, यल्लोजी पाटील, बाबू दोडमनी, कल्पना पवार, रेखा सुतार, रोहिणी नाथबुवा, पीडीओ गोविंद रंगापगोळसह गौंडवाड देवस्थान पंच कमिटीचे सदस्य महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









