जुने बेळगाव, शहापूरनंतर आता येळ्ळूरचा शेतकरी देशोधडीला
बेळगाव : शेतकऱ्यांचा विरोध झुगारून केपीटीसीएल विभागाकडून उच्चविद्युतभारित वाहिन्यांसाठी टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. जुने बेळगाव व शहापूर शिवारानंतर आता येळ्ळूर शिवारामध्येही असे भले मोठे टॉवर उभारले जात आहेत. सुपीक जमिनींमध्ये टॉवर उभारणी सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. हुबळीजवळील नरेंद्र या विद्युत स्टेशनपासून बेळगाव शहरातून उद्यमबागपर्यंत विद्युत वाहिन्या घातल्या जाणार आहेत. उच्चविद्युत भारित (हाय व्होल्टेज) वाहिन्यांसाठी मोठे टॉवर घातले जात आहेत. महिनाभरापूर्वी जुने बेळगाव व शहापूर शिवारात असे टॉवर उभारण्याचे काम सुरू झाले. 15 ते 20 फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये काँक्रीट ओतले जात आहे. काँक्रिटमधून टॉवरसाठीचा पाया उभा केला जात आहे. सध्या शिवारांमध्ये मोहरी, गहू, टरबूज, काकडी, हरभरा यांचे पीक भराला आले आहे. परंतु, एकाचवेळी चार ते पाच जेसीबी उभे करून खड्डे खणले जात आहेत. शहापूर शिवारात काही शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, विरोध झुगारून काम सुरूच ठेवण्यात आले. सध्या येळ्ळूर रोड येथे टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. आधी हलगा-मच्छे बायपास, त्यानंतर रिंगरोड आणि आता असे टॉवर उभारणी केली जात असल्याने शेतकरी संतापले आहेत. केपीटीसीएलकडून मात्र याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही.









