बेळगाव-चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 555 वर्गखोल्यांच्या निर्मितीसाठी 138 कोटींची तरतूद
बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात अनेक शाळांच्या वर्गखोल्या मोडकळीला आल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने विवेक योजना लागू केली. विवेक योजनेतून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये 254 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये 301 वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 138 कोटी रुपये खर्च करून वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराचा बेळगाव जिल्ह्यातील अनेक शाळांना फटका बसला. काही शाळांच्या भिंती कोसळल्या तर काहींचे छत केव्हा कोसळेल, याची शाश्वती नव्हती. त्यामुळे उर्वरित वर्गखोल्यांमध्ये शाळा भरविल्या जात होत्या. विशेषत: ग्रामीण भागात वर्गखोल्यांची समस्या निर्माण होत होती. पटसंख्या असूनही वर्गखोल्या नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती.
राज्य सरकारने विवेक योजनेंतर्गत वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये बेळगाव शहरामध्ये 57, बेळगाव ग्रामीणमध्ये 40, खानापूरमध्ये 24, सौंदत्ती 38, रामदुर्ग 31, बैलहोंगलमध्ये 26, कित्तूरमध्ये 18 वर्गखोल्यांना मंजुरी देण्यात आली. तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात अथणी 47, कागवाड 18, चिकोडी 41, निपाणी 30, गोकाक 35, रायबाग 57 तर हुक्केरी तालुक्यात 42 वर्गखोल्यांच्या बांधकामाला शिक्षण विभागाने मंजुरी दिली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी 2022-23 या वर्षात 36 कोटी 78 लाख रुपयांचा निधी खर्ची करण्यात आला आहे. उर्वरित निधी 2023-24 या वर्षात खर्च केला जात आहे. 254 पैकी 221 वर्गखोल्या बांधण्याच्या निविदा मागविण्यात आल्या. यापैकी 7 खोल्यांचे काम पूर्ण झाले असून 80 वर्गखोल्या बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 38 वर्गखोल्यांचा पाया घालण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच सरकारी शाळांना चांगल्या वर्गखोल्या उपलब्ध होणार आहेत.
92 खोल्यांचे बांधकाम पूर्ण
चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 301 वर्गखोल्या बांधण्यासाठी 44 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापैकी 289 वर्गखोल्या बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. 92 खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 121 खोल्यांचे बांधकाम छतापर्यंत आले आहे.
उर्वरित काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
विवेक योजनेतून वर्गखोल्या बांधण्याचे काम सुरू आहे. सध्या बेळगाव जिल्ह्यात 30 टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव व चिकोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांना चांगल्या दर्जाच्या वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
– मोहन हंचाटे (प्रभारी जिल्हाशिक्षणाधिकारी)









