रस्ते, गटारी, पथदीपांअभावी नागरिकांची गैरसोय : सुविधा न पुरविल्यास पंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा
बेळगाव : कृष्णानगर बेकिनकेरे येथे रस्ते, गटारी, पथदीपाअभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्राम पंचायतीला निवेदन देण्यात आले आहे. मात्र, ग्राम पंचायतीने याकडे दुर्लक्ष करून निवेदनाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून ग्राम पंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. शिवाय येत्या दिवसात सुविधा पुरवल्या नसल्यास ग्राम पंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. कृष्णानगर परिसरात विद्युतखांब आहेत. मात्र, खांबांवर दिवे नसल्याने नागरिकांना रात्रीच्या अंधारात चाचपडत ये-जा करावी लागत आहे. विशेषत: वयस्कर लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गल्लीत गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण होऊ लागल्या आहेत. शिवाय रस्ता नसल्याने धूळ आणि मातीतून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. गावात इतर ठिकाणी रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहेत. मात्र, कृष्णानगर गल्लीमध्ये रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांना धुळीतूनच ये-जा करावी लागत आहे. अशा बिकट परिस्थितीमुळे नागरिकांतून ग्राम पंचायतीबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गोजगा-बेकिनकेरे रस्त्यावर कृष्णानगर वसले आहे. या गल्लीमध्ये दहा-पंधरा घरे आहेत. मात्र, यांना नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. रस्ते, गटारी आणि पथदीप नसल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. येत्या दिवसात सुविधा उपलब्ध करून न दिल्यास ग्राम पंचायतीवर आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
निवेदन देऊनही ग्रा. पं.चे दुर्लक्ष
कृष्णानगर गल्लीमध्ये पथदीप बसवावेत, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून ग्राम पंचायत पीडीओंना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. शिवाय रस्ता आणि गटारीची देखील सुविधा नसल्याने नागरिकांना समस्या निर्माण होत आहेत. सुविधा उपलब्ध न करून दिल्यास ग्राम पंचायतीवर आंदोलन छेडणार आहे.
– चंद्रकांत सावंत (स्थानिक नागरिक)









