पायाभूत विकास महामंडळाकडून सुरू होते काम : स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीचे नव्याने बांधकाम करण्याची योजना
पणजी : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीची दुरुस्ती नव्हे, तर नव्याने संपूर्ण बांधकाम करण्यासाठी गोवा पायाभूत विकास महामंडळाने जी आखणी केली आहे तिला बांदोडकरांच्या दोन नातेवाईकांनी आक्षेप घेतल्याने सुरू असलेले बांधकाम महिनाभर ठप्प झाले आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांची समाधी भाऊसाहेबांच्या बाजूला उभारण्यात आली आहे. त्यासाठी पायाभूत विकास महामंडळाने सुमारे 6.50 कोटी रु. खर्च केले आहेत. मात्र भाऊसाहेबांची समाधी त्याहीपेक्षा आणखी चांगली करण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आणि या प्रकल्पासाठी 10.50 कोटी रु. खर्चाचे कंत्राटही किल्लेकर नावाच्या कंत्राटदाराला दिले. बांदोडकरांची समाधी जुन्या पद्धतीने बांधलेली होती, त्यास आता 50 वर्षे उलटून गेली आहेत. आता आतमध्ये पाणी झिरपते. स्लॅबचे तुकडे पडतात. एकंदरित संपूर्ण बांधकाम तोडल्याशिवाय नव्याने बांधकाम करता येणार नाही. यासाठी समाधीस्थळाची अगोदरची वास्तू तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. बरेचसे बांधकाम तोडण्यात आले असता आणि या प्रकल्पासाठी नव्याने खोदकाम केले जाणार होते एवढ्यात बांदोडकरांच्या दोन नातेवाईकांनी काम अडविले आहे.
पूर्वीप्रमाणेच हवे बांधकाम
बांदोडकरांची समाधी जशी अगोदर बांधलेली होती तशाच पद्धतीची ती पाहिजे, असा हट्ट त्यांच्या दोन नातेवाईकांनी धरला आहे. समाधी पूर्वी होती त्यापेक्षा एका वेगळ्dया स्वरुपात उभारण्याच्या महामंडळाचा इरादा होता. तसा आराखडा तयार करुन प्रत्यक्षात कामास प्रारंभ झाल्यानंतर अचानक एका नातेवाईकाने हट्ट धरला, आम्हाला पूर्वीप्रमाणेच बांधकाम करुन द्या, अशी मागणी त्याने केली आहे.
मुख्यमंत्री समजूत काढण्याची शक्यता
पर्रीकरांची समाधी उभारताना पर्रीकरांच्या चिरंजीवांना महामंडळाने सांगितले की, एक सुंदर पद्धतीचे समाधीस्थळ उभारतो. त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. आता भाऊसाहेबांची समाधी पर्रीकरांच्या समाधीपेक्षाही चांगली व एका वेगळ्dयाच ढंगात उभारण्याचा पायाभूत विकास महामंडळाचा प्रयत्नच रोखून धरला आहे. त्यामुळे कंत्राटदाराने जे समाधीचे अगोदरचे बांधकाम तोडले होते ते तसेच ठेवले व आपली यंत्रणाही हलविली. आता तो परिसर भकास वाटू लागला आहे. आता बहुदा हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे जाईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे संबंधित भाऊंच्या नातेवाईकांची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेतील, असा अंदाज आहे.
देशातील चांगले समाधीस्थळ बनविण्याचे प्रयत्न
वास्तविक, भाऊंची समाधी ही सरकारी पैशातून उभारली जात आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते. पायाभूत विकास महामंडळाने आतापर्यंत जे प्रकल्प उभारले ते अतिशय देखणे उभारलेले आहेत. भाऊंची समाधी हे देशातील एक चांगले समाधीस्थळ बनावे यासाठी महामंडळाचा प्रयत्न होता.









