बिम्स आवारात 36.63 कोटीतून प्रसूती विभागासाठी 100 तर क्रिटीकल केअर विभागासाठी 50 बेडची उपलब्धता
प्रतिनिधी/ बेळगाव
महिलांची प्रसूती म्हणजे एक पुनर्जन्मच असतो. त्यामुळे त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले आहे. बऱ्याच जणांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे घरातच प्रसूती होत असते. त्यामध्ये काहीजणांचा मृत्यूदेखील होत असतो. याची दखल घेत सरकारने प्रसूती विभाग सुरू केला. मात्र तो विभाग आता कमी पडू लागल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (बिम्स) तब्बल 20 कोटी रुपये मंजूर करून आणखी 100 बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन उपचारासाठी 16.63 कोटीमधून 50 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण 36.63 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण गोरगरीब महिलांना लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारकडून आरोग्यसेवेवर अधिक भर दिला जात असल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गोरगरिबांसाठी सरकारी रुग्णालये अधिक उपयोगी ठरत आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील बिम्स आवारात आई-बाळ दक्षता आणि आपत्कालीन विभाग (मदर अॅण्ड चाईल्ड केअर अॅण्ड क्रिटीकल केअर) 150 बेडचे रुग्णालय उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या 250 बेडचा प्रसूती विभाग आहे. याठिकाणी असणाऱ्या सेवासुविधा वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना बेड अपुरे पडत आहेत. त्यामुळे आता स्वतंत्रपणे आई-बाळ दक्षता रुग्णालय उभारण्यात येत आहे. यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर आपत्कालीन (क्रिटीकल केअर) या 50 बेडच्या रुग्णालयासाठी 16.63 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
लवकरच रुग्णसेवेसाठी हॉस्पिटल सुसज्ज
-अशोक शेट्टी (बिम्स संचालक)
बिम्स आवारामध्ये सध्या 250 बेडचे प्रसूती रुग्णालय आहे. यामध्ये जागा अपुरी पडत असल्यामुळे हे नवीन रुग्णालय उभारण्यात येत आहे. याबरोबरच आपत्कालीन रुग्णालयही उभारण्यात येत आहे. यामुळे गोरगरीब महिलांना याचा लाभ होणार आहे. सरकारने निधी मंजूर केला असून सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. लवकरच काम पूर्ण होऊन हे हॉस्पिटल सुसज्ज होईल, असे त्यांनी सांगितले.









