जुना राजवाडा पोलिसांची कारवाई ; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
कोल्हापूर : शहरातील फुलेवाडी येथील मनपाच्या अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून मंगळवारी रात्री दुर्घटना घडली. याप्रकरणी बांधकाम ठेकेदार शशिकांत दिलीप पोवार (वय ४५, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी तत्काळ अटक केली.
त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. त्याच्याविरोधी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद सुधीर बराले (४९, रा. हॉकी स्टेडियमजवळ, कोल्हापूर) यांनी दिली.
फुलेवाडी येथे अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकताना ३० सप्टेंबरच्या रात्री अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. या जखमीपैकी नवनाथ आण्णाप्पा वडर ३४, रा. शाहूनगर, कोल्हापूर) या मजूराचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी या बांधकामाचा ठेकेदार शशिकांत पोवार याला निष्काळजीपणा केल्याप्रकरणी तातडीने अटक केली.
गुन्हा सिध्द झाल्यास होणार कारावास
जुना राजवाडा पोलिसांनी बांधकाम ठेकेदार शशिकांत पोवार याच्या विरोधी कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. बीएनएस कलम १०५ आणि १२५ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास ठेकेदारास आजन्म कारावास किंवा पाच ते १० वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.








