प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्यातील वळपे-विर्नोडा जंक्शनवर उड्डाणपूल उभारा तसेच तेथील सर्व्हिस रस्ता सरकारने तातडीने करून लोकांचे होणारी गैरसोय दूर करावी तसेच ठिकाणी होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी बहुजन समाज पेडणे तालुक्मयाचे अध्यक्ष उमेश तळवणेकर यांनी केली.
वळपे येथून राष्ट्रीय महामार्ग जात असून या ठिकाणी असलेल्या जंक्शनवर रस्ता बांधकाम कंपनीने रस्त्याचे काम हाती घेताना या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे आश्वासन दिले होते. नागरिकांनी याबाबत मागणी उचलून धरल्याने तत्कालीन पंचायत मंडळांने खास विर्नोडा पंचायतीची ग्रामसभा घेऊन उड्डाणपूल होण्यासाठी मागणी केली होती. जर उड्डाणपूल झाले नाही तर आम्ही पंचायत मंडळ सामूहिक राजीनामे देणार असा इशारा सरकारला या सभेत दिला होता. केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनीही या ठिकाणी भेट देऊन विर्नोडा येथील लोकांना आश्वासन देऊन आपण उच्चस्तरीय याबाबत त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून उड्डाणपूल बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. माजी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी या जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्यात यावे असे आदेश संबंधित अधिकारी आणि एमव्हीआर कंपनीच्या अधिकाऱयांना दिले होते. मात्र आता दोन वर्षे उलटली असून रस्ता पूर्णत्वास येत आहे. या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे सोडून आता एमव्हीआर कंपनी हातवर करत आहे, सरकारने याकडे लक्ष द्यावा, अशी मागणे उमेश तळवणेकर यांनी केली.
वळपे जंक्शनजवळ पाचशे मीटरवर संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय आहे. याठिकाणी उड्डाणपूल असून तेथून वळपे येथे पाचशे मीटर विद्यार्थ्यांना सर्व्हिस रस्ता सुरळीत नसल्याने चालत ये जा करावे लागते. या रस्त्याने प्रवासी बसगाडय़ा जात नाहीत. त्यावर वाहतूक कार्यालयाने लक्ष ठेवावे आणि बसगाडय़ा या सर्व्हिस रस्त्याने नेण्यासाठी बसचालकांना आदेश द्यावेत, अशी मागणी उमेश तळवणेकर यांनी केली आहे.
विर्नोडा गावात जाण्यासाठी उड्डाणपूल तसेच सर्व्हिस रस्ता नसल्याने भविष्यात या ठिकाणी अपघात घडण्याची शक्मयता आहे. ग्रामस्थांनी उड्डाणपूल करण्यासाठी आग्रह धरावा तसेच संबंधित खात्याचे अधिकारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रवीण आर्लेकर व जीत आरोलकर यांनी तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी उड्डाणपूल बांधून द्यावा, अशी मागणी उमेश तळवणेकर यांनी पत्रकारांकडे बोलताना केली.









