नागरिकांची महापौरांकडे मागणी : नागरिकांना येण्या जाण्यास अडथळा ठरणार
बेळगाव : अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे रोड अंडरब्रिज बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अंडरब्रिजच्या दोन्ही बाजूंनी सध्या आरेखन केलेले रस्ते अतिशय अरुंद होणार आहेत. याचा फटका भविष्यात नागरिकांना बसणार असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी किमान सात मीटर सर्व्हिस रोड ठेवण्याची मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापौर मंगेश पवार यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली. शहरातील रुंदीकरणानंतर हा रस्ता 60 फुटांचा करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या मालमत्ता कोणत्याही मोबदल्याशिवाय ताब्यात घेण्यात आल्या आहेत. परंतु, सीडीपीनुसार रस्त्याची रुंदी 30 फूट आहे. रहिवासी वसाहतीमध्ये अशाप्रकारे 60 फूट रस्ता असतानाही पुन्हा रेल्वेकडून अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दोन्ही बाजूंना केवळ 9 फूट रस्ता शिल्लक ठेवल्यास नागरिकांना येण्याजाण्यास कायमस्वरुपी अडथळे निर्माण होणार आहेत. अंडरपासचे काम सुरू झाले आहे. ज्यामध्ये 18 मीटर रस्ते केले जाणार आहेत. फुटपाथसाठी 1.50 मीटर, डिव्हायडरसाठी 0.90 मीटर जागा ठेवण्यात आली आहे. अंडरब्रिजच्या खाली अशी व्यवस्था असताना मग सर्व्हिस रोडबाबतच वेगळा विचार का केला जात असल्याचा प्रश्न निवेदनातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडवर लहानशा जागेतून रस्ते, पाणी, गटारी, गॅसवाहिन्या याची व्यवस्था करावी लागणार आहे. हा परिसर रहिवासी वसाहत असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटे विक्रेते आहेत. सर्व्हिस रोड अरुंद झाल्यास या सर्व विक्रेत्यांना याचा फटका बसेल. त्यामुळे याचा विचार करून सर्व्हिस रोड किमान सात मीटर तरी असावा, अशी मागणी निवेदनाद्वारे महापौरांकडे करण्यात आली. यावेळी राजू पवार व इतर नागरिक उपस्थित होते. महापौर मंगेश पवार यांनी यासंदर्भात रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार करून त्यांच्यासमोर समस्या मांडू, असे आश्वासन दिले.









