वार्ताहर /जांबोटी
दारोळी-कोकणवाडा गावादरम्यान असलेल्या संपर्क रस्त्यावरील कारगिळी नाल्यावर पुलवजा बंधारा बांधावा व या संपर्क रस्त्याचे खडीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील जनतेमधून होत आहे. निलावडे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील दारोळी व कोकणवाडा गावच्या संपर्क रस्त्यावरील कारगिळी नाल्यावर पूल नसल्यामुळे पुलाअभावी या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दारोळी व कोकणवाडा हे अंतर सुमारे दोन किलोमीटर आहे. या दोन्ही गावच्या मधोमध कारगिळी नाला वाहत असल्यामुळे पावसाळ्यात व उन्हाळ्याच्या दिवसात देखील दारोळी, कोकणवाडा, निलावडे, मुघवडे, हरिजन केरी आदी गावच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात पुलाअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सध्या या दोन्ही गावादरम्यान शेतवडीतून कच्चा रस्ता वजा पायवाट म्हणून अस्तित्वात आहे. या नाल्यावर बारमाही पाणी असले तरी उन्हाळ्यात नागरिक या नाल्यातून दुचाकीवरून प्रवास करतात.
मात्र पावसाळ्यात जूनपासून हा नाला दुथडी भरून वाहत असल्यामुळे दोन्ही गावचा संपर्क तुटतो. दारोळी गावच्या नागरिकांना पावसाळ्यात निलावडे ग्रा. पं.च्या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी दारोळी-मुघवडे फाटा-निलावडे असा बारा किलोमीटर वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने मोठी गैरसोय होते. तसेच असंख्य शेतकऱ्यांची नाल्याच्या दोन्ही बाजूला शेती असल्यामुळे पावसाळ्यात नाला पार करून जनावरे तसेच शेतीअवजारांची ने-आण करण्यासाठी जीव धोक्मयात घालून नाल्यातून ये-जा करावी लागत.s यामुळे शेतकऱ्यांच्या जीविताला धोका उद्भवतो.यासाठी दारोळी कोकणवाडा दरम्यान असलेल्या कारगिळी नाल्यावर पूल बांधून गावकऱ्यांना रस्त्याची सुविधा उपलब्ध करून होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. तरी आमदार विठ्ठल हलगेकर तसेच जि. पं. उपविभागीय कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष घालून पाठपुरावा करून पूल व रस्त्याच्या कामाला चालना द्यावी, अशी मागणी होत आहे.









