अहिल्या परकाळे,कोल्हापूर
Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समतेचा विचार मांडला आहे. हा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा यासाठी 2005 साली स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने अनेक प्रयत्न करून ते यशस्वीही केले. आता ‘संविधान दूत’ योजनेच्या माध्यमातून घर घर संविधान पोहचवण्याचा केंद्राचा मानस आहे. जेणेकरून अभिव्यक्ती स्वातंत्र आणि प्रत्येक कायद्याचे ज्ञान सर्वसामान्यांना कळावे, हाच मुख्य हेतू आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेतून शिवाजी विद्यापीठाने 2005 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र स्थापन केले. बाराव्या योजनेनंतर युजीसीने 2017 ला या केंद्राचे अनुदान बंद केले.परंतू विद्यापीठ प्रशासनाने स्वनिधीतून या केंद्राला उर्जितावस्था दिली.विद्यार्थी हित लक्षात घेवून आता या केंद्रात दोन शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार धारेवरील पदव्युत्तर पदविका’, ‘भारतीय संविधान प्रमाणपत्र अभ्यासक्रम’, या दोन अभ्यासक्रमाचे गेल्या दोन वर्षापासून जवळपास 150 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहेत. भारताचा सक्षम नागरिक बनण्यासाठी त्यांना या संविधानिक अभ्यासक्रमाचा चांगलाच फायदा होतोय. तसेच ज्या संविधानावर भारत देशाने अमृतमहोत्सव साजरा केला. त्या संविधानातील कायदे, अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याविषयी लोकांमध्ये जनजागृती होतेय. या केंद्रात तीन समाजशास्त्र विषयाचे तर एक मराठी अशा तीन विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली असून डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम करीत आहेत. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एकाचवेळी 125 महाविद्यालयात व्याख्यान घेवून या व्याख्यानाचा ग्रंथ प्रकाशित केला. या उपक्रमामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजले. संविधानिक शिक्षण घेण्यासाठी या केंद्राकडे दिवसेदिवस विद्यार्थ्यांची पावले वळत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची चळवळ विद्यापीठाने अखंडपणे तेवत ठेवली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आचरणात आणून स्वत:मध्ये बदल करून जीवन सुखर करावे, हाच हेतू ‘संविधान दूत’ या योजनेचा आहे. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी प्रवेश घेतल्यानंतर संविधानाविषयी जनजागृती करून आंबेडकरांच्या विचाराचा जागर करावा, यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. प्रवेशित विद्यार्थी, प्राध्यापक भारताची लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता समाजात रूजवत आहेत. समाजातील अनेक घटकांना आपल्या हक्काची संविधानिक अधिकाराची आणि कर्तव्याची जाणीव करून देत आहेत. विद्यापीठाच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजामध्ये जनजागृती होत असून या सेंटरच्या उपक्रमांबद्दल विद्यापीठाचे कौतुक राज्यभर होत आहे.
दोन अभ्यासक्रम सुरू होणार
-पाली भाषा प्रमाणपत्र अध्यासक्रम
-आरक्षणाचे संविधान धोरण
ही परीक्षा घेतली जाते
भारतीय संविधानाची तोंड-ओळख व्हावी यासाठी ऑनलाईन मटेरियल उपलब्ध करून दिले जाते. ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सर्टीफिकेट दिले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना होतोय फायदा
भारतीय संविधानाची इतंभूत माहिती व प्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे दिले जाते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेतली जातेय. परिणामी या केंद्रात जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी प्रवेश घेत आहे.
संविधान लोकशिक्षण बनले पाहिजे
डॉ. आंबेडकर यांची विचारधारा आणि संविधानिक विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे सामाजिक कार्य सुरू आहे. संशोधनाला चालना मिळत असून संविधान लोकशिक्षण बनले पाहिजे, त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
डॉ. एस. एस. महाजन (समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या)
Previous Articleडेगवे- फणसवाडी येथे डॉ.आंबेडकर जयंती साजरी !
Next Article आयपीएलमध्ये सॅमसनचा आगळा विक्रम









