नागरीक संतप्त :वीज खात्याला निवेदन सादर
काणकोण : काणकोण मतदारसंघातील सुरळीत वीज पुरवठ्यासाठी भुमीगत वीज जोडणी गरजेची असून आतापर्यंत 60 टक्के भुमीगत वीज जोडणीचे काम पूर्ण झाल्याची माहिती नुकतीच काणकोणचे आमदार असलेल्या सभापती रमेश तवडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. पावसाळी हंगामाच्या सुरूवातीलाच सतत चार-चार तास वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार या मतदारसंघात घडत असून एका बाजूने गोवा मुक्तीचा 60 वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत अशा वेळी वीज, पाण्याची मूलभूत गरज देखील आमच्या मतदारसंघात पूर्ण होऊ शकली नाही असा स्पष्ट आरोप करून काणकोण काँग्रेस परिवार, जनसेना आणि पाळोळे वासियांच्या प्रमुख नागरिकांनी सरळ काल सोमवार दि. 12 रोजी काणकोणच्या वीज कार्यालयावर मोर्चा नेला आणि काणकोणच्या वीज खात्याचे सहाय्यक अभियंता गोविंद भट यांना या मतदारसंघातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासंबधीचे लेखी निवेदन सादर केले. यावेळी संजय ना. गावकर उपस्थित होते.
या वेळी काँग्रेसचे जनार्दन भंडारी, विकास भगत, वैष्णव पेडणेकर, पाळोळै नागरीक मंचाचे गास्पार कुतिन्हो, गोंयकार एनजीओचे जॅक फर्नाडिस, माजी नगरसेवक स्टेनली ग्रासियस आणि अन्य कार्यकर्ते आणि पाळोळे किनाऱ्यावर व्यवसाय करणारे व्यावसायिक उपस्थित होते. सततच्या खंडित वीज प्रवाहामुळे घरगुती वापराच्या वीज उपकरणावर परिणाम होत असतानाच या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांच्या विशेषता हॉटेल, रेस्टॉरेंट आणि अन्य व्यवसायावर परिणाम होत असतो. अशा तक्रारी यावेळी वीज ग्राहक आणि नागरीकांनी केल्या. काणकोण मतदारसंघातील भुमीगत वीज जोडणीचे काम जवळ जवळ 60 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाची निविदा याच महिन्यात काढण्यात येणार आहे. नवीन एलटी लाईन घालण्याची प्रक्रिया सुरू झाले. आवश्यक असलेल्या ठिकाणी नवीन ट्रान्स्फोर्मर बसविण्याचे काम चालू झाले आहे. विशेषता पालिका क्षेत्रातील जुने लोखंडी वीजेचे खांबे बदलून त्या जागी नवीन खांबे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या मतदार संघासाठी शेल्डे ते कुंकळळी असा वीज केंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या मतदारसंघासाठी 33 हजार व्हॉल्टेज इतका पुरवठा होता. बऱ्याच वेळा शेल्डे किंवा कुंकळळी वीज केंद्रात बिघाड आल्यास त्याचा परिणाम साहजिकच काणकोण मतदारसंघात होत असतो. आपत्कालिन प्रसंगी आपल्या कार्यालयाचे कर्मचारी सतर्क असून वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या बाबतीत लक्ष देत असल्याचे स्पष्टीकरण यावेळी गोविंद भट यानी दिले.









