बेळगाव : वकिलांशी हुज्जत घालत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकातील हवालदार बी. सुणगार यांना मंगळवारी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोमवारी अॅड. श्रीधर कुलकर्णी हे एपीएमसी पोलीस स्थानकात न्यायालयाचा आदेश घेऊन गेले होते. मात्र त्यांना पोलीस निरीक्षक नसल्याचे सांगून दुपारपर्यंत बसवून ठेवण्यात आले. दुपारनंतर एसयुची ड्युटी संपल्यानंतर हवालदार बी. सुणगार पोलीस स्थानकात साध्या गणवेशात आले. त्यावेळी त्यांच्याकडे अॅड. श्रीधर कुलकर्णी यांनी पोलीस निरीक्षक कधी येणार? अशी विचारणा करण्यासह एका प्रकरणात न्यायालयाने बजावलेल्या आदेशाची प्रत दाखविली.
त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हवालदार सुणगार यांनी वकिलांशी हुज्जत घालत असभ्य वर्तणूक केली. त्यामुळे संबंधित हवालदारावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार पोलीस स्थानकात देण्यात आली. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. अखेर मंगळवारी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांची भेट घेऊन सोमवारी घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच संबंधित हवालदारावर खात्याअंतर्गत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी एपीएमसी पोलीस स्थानकातील हवालदार सुणगार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.









