पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी ः एनआयएकडून 9 जणांना अटक
वृत्तसंस्था / चेन्नई
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय तामिळनाडूत पुन्हा एलटीटीई ही दहशतवादी संघटना पुन्हा जिवंत करू पाहत आहे. भारत आणि श्रीलंकेत पाकिस्तानकडून एक गट एलटीटीईचे भूत पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. या गटाकडून एलटीटीईला अमली पदार्थ तसेच शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येत आहे. तर या कटाचा खुलासा झाल्यावर एनआयएने 9 जणांना अमली पदार्थ तसेच शस्त्रास्त्रांसह अटक केली आहे.
श्रीलंकेतील ड्रग माफिया गुनाशेखरन आणि पुष्पराज हे हाजी सलीम नावाच्या एका पाकिस्तानी ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र पुरवठादाराच्या संपर्कात असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले. तामिळनाडूत एलटीटीईला पुन्हा बळ देण्याच्या पाकिस्तानी कारवायांवर एनआयएची बारीक नजर आहे.
फेब्रुवारीतही एलटीटीईला कथित तमिळ राष्ट्रवादाशी जोडून पुन्हा जिवंत करण्याचा कट रचण्यात आला होता. याकरता ग्रामीण भागांना लक्ष्य करण्यात आले होते. हा कट उधळून लावत अनेकांना अटक करण्यात आली होती. युरोपशी जोडलेला हा गट एलटीटीईला निधी पुरविण्यासाठी प्रयत्नशील होता असे तपासात दिसून आले होते.
एनजीओंचा देखील हात
हे आरोपी अनेक एनजीओंच्या संपर्कात होते, त्यांच्या माध्यमातून कथित तमिळ राष्ट्रवादावर चर्चासत्र अन् वेबिनार आयोजित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चेन्नई विमानतळावर श्रीलंकन नागरिक मेरी फ्रान्सिस्काला अटक करण्यात आल्यावर याचा खुलासा झाला होता. 2014 मध्ये एका टोळीचा पर्दाफाश एनआयएने केला होता. कोलंबोतील पाकिस्तानी दूतावासाचा या टोळीला वरदहस्त प्राप्त होता. अनेक ठिकाणी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी दूतावासाकडून या टोळीला निर्देश दिले जात होते.









