सरकारी कार्यक्रमात डावलल्याने श्रीपाद नाईक व्यथित : ’तो’ नियम आपणाला लागू पडत नाही
प्रतिनिधी / पणजी
केंद्रीय मंत्री या नात्याने गोव्यातील अनेक प्रकल्पांसाठी आपण निधी उपलब्ध करून दिला असला तरी त्या प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यास मात्र आपणास डावलण्यात येते. अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. हे जाणूनबुजून घडते की चुकून याची कल्पना नसली तरी चुक सुद्धा एकदाच घडते, वारंवार नव्हे, अशी व्यथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मांडली.
तीन वेळा केंद्रीय मंत्री आणि उत्तर गोव्यातून पाच वेळा खासदार राहिलेले श्रीपाद नाईक यांनी नुकतीच एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही व्यथा मांडली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपासून आपणाला दूर ठेवण्याचे हे षडयंत्र असू शकते. त्याचबरोबर आपली प्रतिमा खराब करण्याचेही काही लोकांकडून प्रयत्न सुरू असून तेच अशा अफवा पसरवत आहेत. या व्यक्ती पक्षातील आहेत की विरोधक आहेत हे माहीत नाही. तसेच माझ्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेण्याचे कुणी प्रयत्न करत आहेत की नाही तेही माहीत नाही. पण त्यात ते यशस्वी होणार नाहीत हे निश्चित. पुढील पाच वर्षे राजकारणात राहण्याएवढा आपण तंदुऊस्त आहे, असे नाईक यांनी सांगितले.
नाईक यांना आतापर्यंत अनेक कार्यक्रमांसाठी तसेच केंद्र सरकारच्या निधीच्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी देखील आमंत्रित करण्यात आले नव्हते. हल्लीच दोनापावला येथे पर्यटक जेटीचे उद्घाटन करण्यात आले. या जेटीच्या नूतनीकरणासाठी पर्यटन मंत्रालयाच्या ’स्वदेश दर्शन’ योजनेतून आम्ही निधी दिला होता. आपण उत्तर गोव्याचा खासदार आहे आणि ही जेटी उत्तर गोव्यातच बांधण्यात आली आहे. त्याशिवाय जेटीच्या उद्घाटनावेळी आपण गोव्यातच होतो तरी आपणाला निमंत्रित करण्यात आले नाही. केंद्र सरकारच्या निधीतून एखादा प्रकल्प उभारण्यात येतो तेव्हा त्याच्या प्रतिनिधीला निमंत्रित करणे हे संकेत असतात. परंतु कुणीतरी जाणूनबुजून असे प्रकार करत आहे. तरीही सरकार माझ्याच पक्षाचे असल्यामुळे आपण त्यावर बोललो नाही. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दखल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घ्यावी. अन्यथा त्यातून सरकारचीच प्रतिमा खराब होण्याची भिती असते, असे नाईक म्हणाले.
लोकसभा उमेदवारीसंबंधी अफवांवर बोलताना नाईक यांनी, निवडणुकीच्या तीन महिने आधी पक्षाच्या संसदीय मंडळाकडून उमेदवारी निश्चित करण्यात येते. अशा वेळी मला डावलण्यात कुणाला स्वारस्य आहे आणि त्यात कुणाचा सहभाग आहे हे मला माहीत नाही. हे चित्र निर्माण करणाऱ्याने ही ’एजंटगिरी’ थांबवावी. त्यांना उमेदवारी मिळविण्यात स्वारस्य असल्यास त्यांनी पुढे येऊन तसे उघड करावे, असे नाईक पुढे म्हणाले.
मी लोकांना सदैव सर्वोत्तम देण्याचे प्रयत्न केले आहेत. याआधी मी केवळ 10 हजारांच्या आघाडीने जिंकायचो. अलीकडच्या निवडणुकीत ती आघाडी 1.10 लाखांवर पोहोचली आहे. आज आपले वय 70 वर्षे आहे. त्यामुळे 75 वर्षांनंतर निवडणूक न लढवण्याचा पक्षाचा निर्णय मला लागू पडत नाही. त्यावरून ही निवडणूक आपण लढवू शकतो. उमेदवारीची स्वप्ने कोण पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे, असे नाईक म्हणाले.









