पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून प्रयत्न ः भारतीय सुरक्षा दलांकडून सतर्कता
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा विळखा घट्ट करण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय सातत्याने प्रयत्न करत आहे. पाकिस्तानात सक्रीय दहशतवादी संघटनांनी आता महिला ओव्हरग्राउंड वर्कर आणि अंडरग्राउंड वर्कर्सच्या जाळय़ाला सक्रीय करण्याचा कट आखला आहे. आयएसआयकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक दहशतवादी प्रशिक्षण तळ चालविला जात असून तेथे महिलांना दहशतवादाचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर सातत्याने होत असलेल्या कारवाईमुळे बिथरलेला पाकिस्तान आता केंद्रशासित प्रदेशात दहशतवादाचे भूत पुन्हा उभे करण्याचा नवा गेम प्लॅन रचत आहे. पाकिस्तान आता महिलांना ओव्हर ग्राउंड वर्कर आणि अंडर ग्राउंड वर्कर म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देत आहे. या महिलांद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद फैलावण्याचा आयएसआयचा कट आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये ओव्हरग्राउंड वर्कर आणि अंडरग्राउंड वर्कर्स हेच दहशतवाद्यांना सर्वप्रकारची मदत पुरवत असतात. केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी आयएसआय आता महिलांची निवड करत आहे. दहशतवाद्याच्या कुटुंबातील महिलेला याकरता आयएसआयकडून प्राथमिकता दिली जात असल्याचे समोर आले आहे.
ओव्हरग्राउंड वर्कर आणि अंडरग्राउंड वर्कर म्हणून दहशतवादी संघटनेत सामील महिलांकडून आयईडी स्टिकी बॉम्बद्वारे स्फोट घडवून आणण्याचा आयएसआयचा कट आहे. मागील काही काळापासून पाकिस्तानातून सातत्याने ड्रोनद्वारे रेडी टू यूज स्टिकी बॉम्ब पाठविले जात आहेत. या बॉम्बद्वारे स्फोट घडवून आणणे महिलांना शक्य असल्याचे आयएसआयचे मानणे आहे.
जवळपास 36 महिलांना घातपाताचे प्रशिक्षण
महिलांवर सर्वसाधारणपणे सुरक्षा यंत्रणा संशय व्यक्त करत नसल्याने आयएसआयने हे पाऊल उचलले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मुरीदके येथे आयएसआयकडून एक दहशतवादी प्रशिक्षण तळ चालविला जात असून यात 36 हून अधिक महिलांना घातपात घडवून आणण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात संबंधित महिलांना धार्मिक शिक्षणासह शस्त्रास्त्र हाताळणी अन् आयईडी सक्रीय करत स्फोट घडवून आणण्याचे प्रशिक्षण देण्यात येतेय.









