रामनाथी फोंडा येथील हिंदू राष्ट्र अधिवेशनात शंकर खराल यांचा आरोप, भारतीय संस्कृती प्रसार करणे आवश्यक : डॉ. चारुदत्त पिंगळे
फोंडा : नेपाळमध्ये हिंदू बहुसंख्य असला तरी, चीन, युरोप आदी विदेशी शक्तींकडून मिळणाऱ्या अर्थसाहाय्यामुळे येथील हिंदू जनता त्यांच्या विचारांप्रमाणे कार्य करत आहे. तसेच भारतातील कट्टरतावादी डाव्या विचारसरणीच्या काही विद्यापीठांमधून हिंदूंविरोधी विचाराचे कार्यकर्ते नेपाळमध्ये येऊन हिंदूविरोधी तथा नक्षलवादी कारवाया करीत आहेत. तरीही नेपाळमध्ये पूर्वीपेक्षा हिंदूसंघटन वाढले आहे, अशी माहिती नेपाळ येथील विश्व हिंदू महासंघाचे शंकर खराल यांनी दिली. रामनाथी फोंडा येथे सुऊ असलेल्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित प्रतिनिधींच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी इंडोनेशीयातील बाली येथील रस आचार्य डॉ. धर्मयश, अमेरिका येथील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडवान्स सायन्सचे डॉ. नीलेश ओक, युथ फॉर काश्मिरचे दिल्ली येथील अध्यक्ष विठ्ठल चौधरी व हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे हे उपस्थित होते.
सनातन धर्मामुळेच वैश्विक स्तरावर हिंदूंचे संघटन शक्य
हिंदू धर्मातील विज्ञानाला अंधश्रद्धा म्हणून तसेच राम कृष्णादी अवतारांना काल्पनिक म्हणून अपप्रचार केला जात आहे. प्रत्यक्षात आजच्या आधुनिक विज्ञानाच्या खगोलशास्त्राच्या आधारे त्यांचा कालावधी निश्चित करता येऊ शकतो. त्यामुळे विज्ञानाच्या आधारे या अपप्रचाराचे उत्तर देणे आणि हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे सहज शक्य आहे. त्यादृष्टीने सर्वांनी सनातन धर्म शिकण्याची सुरुवात आपल्या घरातून विशेषत: लहान मुलांपासून केली पाहिजे. अमेरिकेच्या वैद्यकीय, औद्योगिक व संशोधन क्षेत्रात भारतीयांचा वाटा मोठा आहे. मात्र तेथे स्थायिक झालेली भारतीयांची पुढील पिढी संस्कृतीपासून तुटत चालली आहे. योगा व आयुर्वेदासारखी माध्यमे तसेच भारतीय संस्कार त्यांचे हिंदुत्व टिकवून ठेऊ शकतील, असे डॉ. नीलेश ओक यांनी नमूद केले.
इंडोनेशियात आमच्या पिढीवर रामायण व भगवद्गीता या ग्रंथातील विचार व नितीमत्तेतून संस्कार झाले. माणसाला माणूस म्हणून घडविण्यात या ग्रंथातील शिकवण खूप मोलाची आहे. त्यातच भावी पिढीचे खरे भवितव्य आहे, असे डॉ. धर्मयश म्हणाले. काश्मिमधील परिस्थितीवर बोलताना काश्मिरनंतर आता दहशतवादी हल्ले हे जम्मूकडे सरकत आहेत. पनून काश्मिरच्या निर्मितीनेच काश्मिरी पंडितांचे पुनवर्सन शक्य आहे. या पनून काश्मिरच्या सथापनेत भारतीय आणि सनातन हिंदू धर्मिय महत्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास विठ्ठल चौधरी यांनी व्यक्त केला. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला हे मान्य करुन सरकारने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाविषयी कृती केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
विदेशी गेलेले पुन्हा भारतात वळले
भारत सोडून बाहेर गेलेले लोक पुन्हा भारताकडे वळत आहेत. अन्य धर्मिय लोक मोठ्या प्रमाणावर सनातन धर्माकडे वळताना दिसतात. केवळ भारतीय योग, आध्यात्म, आयुर्वेदच नव्हे तर समृद्ध आणि परिपूर्ण सनातन भारतीय ज्ञानामुळे ते प्रभावित होऊन सनातन धर्माकडे आकर्षित होतील, असा विश्वास डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी व्यक्त केला. भारतीय संस्कृती ही जागतिक स्तरावरील सर्व धर्मियांना एकत्र आणू शकते. तिचा प्रसार करणे आवश्यक असून अधिवेशनाचे हेच मुख्य प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले.









