ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्र सरकार इंडिया आघाडीला घाबरलं आहे. त्यामुळे ते रोज नवीन काहीतरी घेऊन येत आहेत. आमची निष्पक्ष निवडणुकीची मागणी होती. ती मागणी पुढे ढकलण्यासाठी आता ‘वन नेशन, वन इलेक्शन’ घेऊन आले. मला वाटतं, आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हे एक षडयंत्र आहे, त्यांना निवडणूकाच घ्यायच्या नाहीत, असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ठीक आहे, पण फेअर इलेक्शन ही आमची मागणी आहे. एक देश, एक निवडणूक नव्हे, आम्हाला निष्पक्ष निवडणूका हव्या आहेत. देशात निष्पक्ष निवडणूका होत नाहीत. निष्पक्ष निवडणुकीची आमची मागणी पुढे ढकलण्यासाठी त्यांनी केंद्र सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ घेऊन आले आहे.
भ्रष्ट निवडणूक आयोग असेपर्यंत देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ होणार नाही. भ्रष्टाचारी निवडणूक आयोगाला आधी बाजूला करा, मग निवडणुका घ्या. आगोदर पारदर्शी निवडणुका घेऊन दाखवा, असे राऊत म्हणाले.








