एआयएफएफ’चे अध्यक्ष कल्याण चौबेंनी कार्यकारी समितीपुढे मांडली कल्पना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) सौदी अरेबियात होणाऱ्या 2034 च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील काही सामने आयोजित करण्याच्या योजनेवर विचार करत आहे, असे सदर राष्ट्रीय क्रीडासंस्थेच्या अंतर्गत परिपत्रकात म्हटले आहे. गेल्या महिन्यात फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था ‘फिफा’ने 31 ऑक्टोबरची अंतिम मुदत झाल्यानंतर 2034 च्या विश्वचषकाच्या आयोजनासाठी सौदी अरेबिया हा एकमेव बोलीदार आहे, याची पुष्टी केली होती.
18 ऑक्टोबर रोजी झालेल्या आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) तातडीच्या बैठकीतही सौदी अरेबियाच्या बोलीला पाठिंबा देण्यात आला होता. भारतानेही या निर्णयाला पाठिंबा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ‘एआयएफएफ’चे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी कार्यकारी समितीच्या सदस्यांना सांगितले आहे की, भारताने 2034 च्या विश्वचषकाच्या काही सामन्यांचे आयोजन करण्याचा विचार केला पाहिजे.
48 संघांचा समावेश राहणार असलेल्या त्या स्पर्धेत 104 सामने असतील आणि त्यापैकी काही म्हणजे सुमारे 10 सामने भारतात आयोजित करण्याची कल्पना पुढे आली अहे. अध्यक्षांनी बैठकीत सांगितले की, भारताने 2034 मध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे सहयजमान होण्यावर विचार करायला हवा किंवा त्यादृष्टीने काम करण्याची योजना आखली पाहिजे, असे 9 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘एआयएफएफ’च्या कार्यकारी समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तात म्हटले आहे.
2030 ची स्पर्धा तीन खंडांत (आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका) आयोजित करण्याचा निर्णय ‘घेतल्यानंतर ‘फिफा’ने 2034 च्या विश्वचषकाच्या आयोजनासाठीची पात्रता आशिया किंवा ओशेनियापुरती मर्यादित ठेवली होती. भारताने ‘एएफसी आशियाई चषक स्पर्धे’चे यजमानपद मिळविण्याच्या प्रयत्नातून माघार घेतल्यानंतर सौदी अरेबिया 2027 मध्ये ही स्पर्धा आयोजित करणार आहे.









