शेतकऱ्यांची मागणी : सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्याचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्ग बेळगाव व खानापूर तालुक्यातील सुपीक जमिनीतून जात आहे. यामुळे शेकडो शेतकरी भूमीहीन होणार आहेत. आधीच या भागात अल्पभूधारक शेतकरी असताना रेल्वेमार्गासाठी शेतीच गेली तर या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळणार असल्याने राज्य सरकारने पर्यायी मार्गाचा विचार करावा. तसे न झाल्यास अधिवेशनकाळात रास्तारोको करण्यासोबतच उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
सध्याचा बेळगाव-धारवाड हा रेल्वेमार्ग लोंढामार्गे जातो. परंतु हा मार्ग घनदाट जंगलातून असल्याने रेल्वेच्या वेगावर मर्यादा येत आहे. त्यामुळे व्हाया कित्तूर नवा मार्ग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य व केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा रेल्वेमार्ग करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये देसूर, प्रभूनगर, गर्लगुंजी, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, अंकलगी, के. के. कोप्प या गावांमधील सुपीक जमिनीतून रेल्वेमार्ग जाणार आहे. शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध दर्शवत देसूर ते के. के. कोप्प दरम्यान पर्यायी मार्ग सूचविला होता. परंतु राजकारण्यांच्या दबावामुळे या मार्गाचा रेल्वे प्रशासनाने विचार केलेला नाही.
पर्यायी मार्ग झाल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर
पर्यायी मार्ग झाल्यास शेतकऱ्यांची सुपीक जमीन वाचणार आहे. हा पर्यायी मार्ग खडकाळ जमिनीतून शेतकऱ्यांनी सूचविला असल्याने सरकारी पैशाचीही बचत होणार आहे. परंतु रेल्वे प्रशासन या मार्गाचा विचार करीत नसल्याने येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी रास्तारोकोसह आंदोलन करणार आहेत. सरकारने विचार न केल्यास भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी प्रसाद पाटील, प्रशांत पाटील, मारुती लोकूर यांच्यासह नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, गर्लगुंजी, के. के. कोप्प या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









