85 किलो प्लास्टिक जप्त : 22 हजार दंड वसूल
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार सिंगलयूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील शहरातील व्यापारी कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी धाडसत्र राबवून प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईवेळी 85 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
प्लास्टिकविरोधी कारवाई राबविण्यासाठी महापालिकेने चार पथकांची स्थापना केली आहे. या पथकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईत सातत्य नाही. पण अधुनमधून राबविण्यात येणाऱया कारवाई वेळी प्लास्टिक जप्त करण्यात येत आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच साठा किंवा विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील काही व्यावसायिक अद्यापही प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत आहे. त्याचप्रमाणे नागरिकदेखील सिंगलयूज प्लास्टिकचा वापर करीत आहेत. त्यामुळे शुक्रवारी विविध भागात धाडसत्र राबवून 85 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
जागृती मोहीम राबवून सिंगलयूज प्लास्टिकचा वापर करणाऱया नागरिकांवरही कारवाई करण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱयांकडून 50 ते 500 रुपयापर्यंत दंड आकारण्याची तरतूद प्लास्टिक बंदी कायद्यात आहे. या कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा विचार मनपाने चालविला आहे.









