39 हजार 125 कोटींची संरक्षण सामग्री खरेदी अपेक्षित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने 39 हजार 125 कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्री खरेदीच्या करारांना संमती दिली आहे. असे पाच करार करण्यात आलेले आहेत. त्यांच्यात खासगी संरक्षण सामग्री उत्पादकांशी केलेल्या करारांचाही समावेश आहे. मिग 29 विमानांसाठी इंजिने, क्लोज इन वेपन सिस्टिम (सीआयडब्ल्यूएस), उच्चशक्तीचे रडार (एचपीआर) आणि ब्राम्होस या करारांचा समावेश आहे.
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडून मिग 29 विमानांसाठी आरडी-33 प्रकारची इंजिने खरेदी केली जाणार आहेत. हा 5,249.72 कोटी रुपयांचा करार आहे. ही इंजिने रशियाने हस्तांतरीत केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात येणार आहेत.
लार्सन अँड टुब्रोशी करार
क्लोज इन वेपन सिस्टीम विकत घेण्यासंबंधी लार्सन अँड टुब्रो या खासगी कंपनीशी दोन करार करण्यात आले असून ते एकंदर 7,668.82 कोटी रुपयांचे आहेत. या यंत्रणेमुळे देशातील विविध स्थानी असणाऱ्या संरक्षण विमानतळांची सुरक्षा वाढणार आहे. ही व्यवस्था वायुदलाची मारक क्षमता वाढविण्यासाठी अनुकूल ठरणार आहे. याशिवाय उच्चशक्तीचे रडार (एचपीआर) खरेदी केले जाणार आहेत. त्यांची किंमत 5,700.13 कोटी इतकी आहे. या रडारमुळे विमान आणि अन्य संरक्षण साधनांची सुरक्षा वाढणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
ब्राम्होस क्षेपणास्त्रांची खरेदी
ब्राम्होस या रशियन तंत्रज्ञानाधारित भारतनिर्मित क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यासाठी दोन करार करण्यात आले आहेत. ते 19,518.19 कोटी रुपयांचे आहेत. युद्धनौकांवरुन मारा करणाऱ्या ब्राम्होस क्षेपणास्त्रांची खरेदी केली जाणार असून युद्ध विमानांमधून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांची खरेदीही केली जाणार आहे.









