बायडेन-क्षी जिनपिंग चर्चेचे फलित, तैवानवर मतभेद तीव्र
वृत्तसंस्था /सॅन फ्रान्सिस्को

उच्चस्तरीय सेनासंपर्क पुनर्स्थापित करण्यासंबंधात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात एकमत झाले आहे. साधारणत: एक वर्षानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे शिखर परिषद झाली. या परिषदेत काही निर्णय घेण्यात आले. त्यांपैकी हा महत्वपूर्ण निर्णय होता. मात्र, तैवानच्या प्रश्नावर दोन्ही देशांमधील तीव्र मतभेदही समोर आले आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथे सध्या आशिया-प्रशांतीय आर्थिक सहकार्य परिषद सुरू आहे. त्यानिमित्ताने जिनपिंग तेथे गेले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची थेट परस्पर चर्चा झाली आहे. चीनने नुकताच तैवानच्या अवतीभोवतीच्या समुद्रात नौदलाचा सराव केला आहे. तर दक्षिण चीन समुद्रात त्याने आक्रमक भूमिका घेऊन आपले नौदल नियुक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली.
सेना संपर्कावर एकमत
या शिखर परिषदेतून फारसे काही साध्य होण्याची शक्यता नव्हती. मात्र, अमेरिकेची इच्छा दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय सेना संपर्क पुनर्स्थापित व्हावा, अशी आहे. जिनपिंग यांनी हा प्रस्ताव तत्वत: मान्य केल्याने हा संपर्क पुन्हा स्थापित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साधारणत: एक वर्षापूर्वी दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या एका युद्धनौकेवर चीनची युद्धनौका आदळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सेना संपर्काचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
संरक्षणमंत्र्यांची टळली भेट
चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू बेपत्ता झाल्याने त्यांना मंत्रिपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्यास्थानी अद्याप नव्या संरक्षणमंत्र्यांची नियुक्ती जिनपिंग यांच्याकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांची चीनच्या संरक्षणमंत्र्यांशी होणार असणारी भेट टळली आहे. ती केव्हा होईल यासंबंधी सध्या कोणतेही अनुमान व्यक्त करता येत नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे बायडेन आणि जिनपिंग यांच्यातच चर्चा झाली.
तैवानचा तिढा कायम
तैवान या सर्वाधिक संवेदनशील विषयावर मात्र, दोन्ही देशांमधील तीव्र स्वरुपाचे मतभेद कायम राहिले आहेत. तैवानच्या सार्वभौमत्वाविषयी कोणतीही तडजोड न करण्याचा अमेरिकेचा निर्धार बायडेन यांनी चर्चेनंतरच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तर तैवान घेतल्याशिवाय राहणार नाही, असा सूर जिनपिंग यांनी लावला. त्यामुळे कोणताही उपाय दृष्टीपथात नाही, हे अधिकच स्पष्ट झाले.
युद्धावर चर्चा झाली का?
सध्या होत असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर बायडेन आणि जिनपिंग यांच्यात चर्चा झाली का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. याचे उत्तर देण्यात आलेले नाही. तथापि, अमेरिका आणि चीन हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रितीने या युद्धात गुंतले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये या विषयावर चर्चा झाली नसणे शक्य नाही, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. मात्र, हा विषय संवेदनशील असल्याने यावर उघड भाष्य केले जाणार नाही, हेही निश्चित मानले जात आहे. त्यामुळे उत्सुकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.









