मळेवाडा लोकांना विश्वासात घेऊनच सर्व समस्या सोडविणार : कसलाही विपरित परिणाम होणार नाही : मंत्री फळदेसाई
सांगे : रिवण ग्रामसभेत नागरिकांनी मळेवाडा येथे होऊ घातलेल्या आयआयटीला पूर्ण पाठिंबा व्यक्त केलेला असून यासंबंधी ग्रामसभेत एकमताने ठराव संमत करण्यात आला. या ग्रामसभेला ग्रामस्थांच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांना निमत्रित करण्यात आले होते. मळेवाडा येथील गावकऱ्यांचे समाधान करण्यात आले असून आयआयटीमुळे कोणत्याही परिस्थितीत गावावर विपरित परिणाम होणार नाही. तसेच मळेवाड्यावरील लोकांची जबाबदारी आपल्यावर असून सर्व समस्यांवर तोडगा काढला जाईल, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
ही ग्रामसभा रविवारी रिवण येथील सोसायटी हॉलमध्ये सरपंच वैशाली नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंच सूर्या नाईक यांनी ग्रामसभेचे कामकाज सरपंच वैशाली नाईक यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेले. प्रथम पॉली फर्नांडिस यांनी आयआयटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अनेकांनी आयआयटीच्या बाजूने आपली मते मांडली. मंत्री फळदेसाई यांनी आयआयटीसंदर्भात विस्तृत निवेदन केले. ज्यांना मते मांडायची आहेत त्याना संधी देऊन सर्वांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांनी आयआयटी कुणाला नको त्यांनी हात वर काढण्याची सूचना केली. यावेळी एकही हात वर आला नाही. त्यानंतर आयआयटी कुणाला हवी आहे त्यांनी हात उंचावून संमती द्यावी अशी सूचना करण्यात आली असता उपस्थित नागरिकांनी हात उंचावून आयआयटीचे मळेवाडा, रिवण येथे स्वागत केले. यानंतर हा ठराव संमत झाल्याचे घोषित करण्यात आले.
भौगोलिक चित्र बदलण्याची भीती निरर्थक : फळदेसाई
मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, मळेवाडा येथे आयआयटी येणार असून त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सरकारी पातळीवर चालू आहे. रिवण व कावरेपिर्ला ग्रामपंचायतींच्या सीमेवर आयआयटी येणार असून केवळ मळेवाडा सोडल्यास अन्य गाव किंवा वाड्यांचा त्याच्याशी संबंध येणार नाही. गेली 35 ते 40 वर्षे ही जमीन लागवडीखाली नाही. तसेच तिची मालकी गोव्याबाहेरील व्यक्तीकडे आहे. मळेवाडा येथील लोकांनी विनाकारण घाबरण्याची गरज नाही. त्यांना विश्वासात घेऊनच आपण समस्या सोडविणार आहे. आयआयटी आली की, येथे 15 ते 20 हजार बाहेरचे लोक येऊन येथील भौगोलिक चित्रच बदलून जाईल अशी जी भीती पसरविली जात आहे ती निरर्थक आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.
स्थानिकांना स्थलांतरित करण्यात येणार नाही
मळेवाडा येथील लोकांना स्थलांतरित करण्यात येणार नाही. आपण कुठलाही पोलाद उद्योग आणत नाही. आयआयटी हा सरकारी शैक्षणिक प्रकल्प आहे. त्यामुळे प्रदूषण होणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन सर्वसंमतीनेच आपल्याला हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे असे फळदेसाई यांनी सांगितले. तसेच अप्रत्यक्षरीत्या प्रकल्पाला विरोध करू पाहणाऱ्या आणि मळेवाडा ग्रामस्थांच्या मनात विष पेरू पाहणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला. येत्या महिन्याभरात आयआयटी उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील, असे फळदेसाई यांनी सांगितले.
ऋषिवनात आयआयटीचे स्वागत
रिवण म्हणजे ऋषिवन. एकेकाळी येथे ऋषी वास्तव्य करून जप आणि ध्यान करायचे, गुऊकुल चालवायचे. त्या ऋषिवनात आयआयटी हा शैक्षणिक प्रकल्प येत असून आम्ही त्याचे स्वागत केले पाहिजे, असे संदीप प्रभुदेसाई यांनी सांगितले. प्रगतशील शेतकरी पांडुरंग पाटील यांनी सांगितले की, आयआयटी ज्या जमिनीत येणार आहे ती जमीन गोव्याबाहेरील व्यक्तीची आहे. त्यामुळे तेथे बाहेरील लोकांची वस्ती होण्याची भीती आहे. त्या जमिनीवर इतरांचा डोळा आहे. त्यामुळे सरकारने ही जमीन लवकरात लवकर ताब्यात घेऊन आयआयटी स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. ऊंझारियो डिसोझा यांनी रिवण, मळेवाडा येथे आयआयटी आणल्याबद्दल मंत्री फळदेसाई यांचे अभिनंदन केले.
जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी सांगितले की, यापूर्वीही कोठार्ली येथे आयआयटीचे आपण स्वागत केले होते. त्यावेळी केपेकर यांनी रिवणला आयआयटी न्यावी अशी आपल्यावर टीका होत होती. आपण रिवणमध्ये आयआयटी प्रकल्पाचे स्वागत करतो. आयआयटीमुळे रिवणसह सांगे व आजुबाजूचा विकास होणार, असे केपेकर म्हणाले. कृतिका राऊत, विनोद जांबावलीकर, संदीप अडणेकर यांनीही आयआयटीचे समर्थन केले. पंच रोझिता यांनी आयआयटीविषयी सविस्तर तांत्रिक माहिती देण्यासाठी आयआयटीशी संबंधित अधिकारी आणि पर्यावरणतज्ञ यांना पाचारण करून अधिक प्रकाश टाकण्याची मागणी केली असता मंत्री फळदेसाई यांनी ती मान्य केली. उपसरपंच सूर्या नाईक यांनी मळेवाडा येथे बंधारा बांधण्यासाठी लवकरच निविदा जारी करण्यात येणार असल्याचे आणि संपूर्ण पंचायत मंडळ मळेवाडा लोकांबरोबर राहणार असल्याचे सांगितले. या ग्रामसभेत इको-सेन्सेटिव्ह झोन, इतर विकासकामे, दवाखाना, वीज-पाणी प्रश्न, आडे पुलाची दुऊस्ती आणि देखभाल आदी विषयांवर चर्चा करून ठराव घेण्यात आले. सरपंच, उपसरपंचांसह नऊही पंचायत सदस्य हजर होते. सचिव मंजुळ गावकर यांनी मागील ग्रामसभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. सरपंच नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले.









