वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांच्याकडे आता व्हाईटबॉल संघांची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. 2027 आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सीएसएने शुक्रवारी जाहीर केले.
2023 पासू कॉनराड हे द.आफ्रिका कसोटी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत असून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर एप्रिलमध्ये व्हाईटबॉल संघांचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी पद सोडल्यानंतर हे पद रिकामी झाले होते. आता कॉनराड हेच त्यांचे काम पाहणार आहेत. येत्या जुलैमध्ये झिम्बाब्वे व न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या व्हाईटबॉल मालिकांपासून 58 वर्षीय कॉनराड संघाची सूत्रे सांभाळतील. ‘कॉनराड यांनी कसोटी संघासमवेत केलेली कामगिरीच त्यांची क्षमता दाखवून देते. त्यांनी भक्कम पाया रचला असून कसोटी वातावरणात मजबूत ओळख निर्माण केली आहे. व्हाईटबॉल क्रिकेटसाठी त्यांना आणताना मला खूपच आनंद होतोय,’ असे सीएसएचे नॅशनल टीम व हाय परफॉर्मन्सचे डायरेक्टर इनॉक एन्कवे म्हणाले.
कॉनराड यांच्या मार्गदर्शनाखाली द.आफ्रिका संघाने पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. जेतेपदासाठी त्यांची लढत विद्यमान चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 जूनपासून लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली द.आफ्रिका संघाला दोन महत्त्वाच्या मोठ्या स्पर्धाना सामोरे जावे लागणार आहे. भारतात 2026 मध्ये होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा आणि 2027 मध्ये मायदेशातच होणारी वनडे विश्वचषक स्पर्धा यांचा त्यात समावेश आहे.









