म्हासुर्ली / वार्ताहर
कोनोली (ता.राधानगरी) परिसरात गेल्या आठ दिवसापासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे.परिणामी ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे.वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोनोली गावासह पानारवाडी,हुंबे धनगरवाडा, पाटीलवाडी, पखालेवाडी,कुपलेवाडी आदि गावांना गगनबावडा येथील सब स्टेशन मधून विद्युत पुरवठा केला जातो.मात्र गेल्या काही दिवसापासून या परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहत असल्याने झाडांच्या फाद्यां विद्युत तारांना लागत आहेत.परिणामी विद्युत यंत्रणेत बिघाड निर्माण झाला असून परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णता खंडित झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी कुपलेवाडी येथील घरावर डोंगराचे भूस्खलन झाले होते.त्यात दोन माणसांच्यासह काही जनावरे मृत्युमुखी पडली होती.त्यामुळे प्रशासनाने कुपलेवाडी ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी जावे असे सांगितले आहे. त्यात सध्या या परिसरात मुसळधार पाऊस पडत असून वीज पुरवठा खंडित आहे.त्यामुळे कुपलेवाडी ग्रामस्थांसह इतर वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
तसेच घरातील दळप कांडप संपल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. तसेच वीज खंडित असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तरी प्रशासनासह विद्युत वितरण कंपनीने परिसराचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.









