वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्या पक्षाने आता ‘झीरो टू हीरो’ हे महत्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने प्रचंड विजय मिळविला असून काँग्रेससह भारतीय जनता पक्षाचाही सफाया केला होता. तथापि, भारतीय जनता पक्षाने काही जागा मिळविण्यात यश प्राप्त केले होते. काँग्रेसला मात्र मतदारांनी पूर्णत: नाकारले होते. यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने काही जागांची प्राप्ती केली, तरी सत्तास्थापनेची सूत्रे आपल्या पक्षाच्या हाती येतील, अशी काँग्रेसची आशा आहे. त्यामुळे ‘किंग’ होता आले नाही, तरी ‘किंगमेकर’ होण्याच्या दृष्टीने हे अभियान हाती घेण्यात आले असावे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता नाही, यावर बहुतेक साऱ्या तज्ञांचे एकमत आहे. मात्र, आम आदमी पक्षाला काँग्रेसने काही प्रमाणात रोखले, तर आम आदमी पक्षाला काँग्रेसच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावे लागण्याची वेळ येऊ शकते. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा दिल्लीत सत्तासहवास घडू शकतो, अशी काँग्रेस नेत्यांची भावना आहे.









