अग्निपथ योजनेविरोधात उठवला आवाज ः हिंसा न करता आंदोलन करण्याचे आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर रविवारी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. विविध ठिकाणी हिंसक आंदोलने होत असताना आता काँग्रेसदेखील सहभागी झाली आहे. रविवारी काँग्रेसच्यावतीने दिल्लीच्या जंतरमंतरवर ‘सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या या आंदोलनात प्रियांका गांधींसह काँग्रेस नेते अग्निपथविरोधी फलक घेऊन सहभागी झाले होते. ज्ये÷ नेते सलमान खुर्शिद, मनिष तिवारी, सचिन पायलट, शक्ति सिंह गोहिल आदी नेतेही याप्रसंगी उपस्थित होते. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन छेडण्यात आले.
‘सत्याग्रह’ आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी या योजनेवरुन केंद्र सरकारवर टीका केली. ही खूप कठीण वेळ आहे. सरकारने या योजनेचा कोणताही विचार केला नसल्याचे पायलट म्हणाले. तसेच हिंसाचार हे कशावरचेही उत्तर नसून त्यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. मात्र जनतेच्या मनातील संतापाचा विचार सरकारला करावा लागेल असे पायलट म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना बेरोजगारीच्या मार्गावर चालण्यास भाग पाडले आहे. तरुणांना वेळोवेळी नोकऱयांच्या खोटय़ा आशा दिल्या जात आहेत. 8 वर्षात 16 कोटी नोकऱया देण्याचे आमिष दाखवणाऱया सरकारने तरुणांना फक्त पकोडे तळण्याचे ज्ञान दिल्याची टीका त्यांनी केली.
प्रियांका गांधी यांनीही सरकारवर कठोर शब्दात टीका केली. सरकार सर्वसामान्यांसाठी योजना बनवत नाही, तर मोठय़ा उद्योगपतींसाठी योजना बनवते. अनेक तरुणांचे सैन्य भरतीचे स्वप्न असते. पण या नव्या भरती प्रकियेमुळे तरुणांचे नुकसान होणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच हिंसा न करता तरुणांनी आंदोलन छेडावे. आंदोलन सुरू ठेवा, काँग्रेस तुम्हाला साथ देईल, असे प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या.









