भारतीय जनता पक्षाचा आरोप, काँग्रेसचा इन्कार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीत तीन दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या सर्वात मोठ्या साठ्याशी काँग्रेसचा संबंध आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार हा काँग्रेसशी संबंधित आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. मात्र, या आरोपीला दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून काढण्यात आले आहे, असा दावा करत काँग्रेस पक्षाने हा आरोप फेटाळला आहे.
गुरुवारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सूत्रधाराचे छायाचित्र प्रसिद्ध केले. दिल्ली पोलिसांनी बुधवारी 560 किलो कोकेन आणि 40 किलो मारिजुआनाचा साठा जप्त केला होता आणि चार आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्यांमध्ये तुषार गोयल नामक एका युवकाचा समावेश आहे. हा युवक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या युवा शाखेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख होता, असा आरोप त्रिवेदी यांनी केला होता.
काँग्रेसचा नेमका संबंध काय…
राजधानी दिल्लीत पडकण्यात आलेल्या 5,500 कोटी रुपयांच्या अमली पदार्थ साठ्याशी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा संबंध आहे, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. तसाच या साठ्याशीही काँग्रेसचा काही संबंध आहे काय, आणि अंमली पदार्थांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग काँग्रेस निवडणुका लढविण्यासाठी करत आहे काय, असे प्रश्न सुधांशु त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले होते.
काँग्रेसचा इन्कार
काँग्रेसने या आरोपांचा इन्कार केला आहे. तुषार गोयल हा दिल्ली काँग्रेसच्या आरटीआय विभागाचा प्रमुख होता. तथापि, त्याला दोन वर्षांपूर्वी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या संबंधात पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत गोयल याचा काँग्रेसशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसने केले आहे.









