निवडणूक काळात उकळले कोटय़वधी रुपये : संकल्प आमोणकर यांचा दावा,’काँग्रेसमुक्त’ भारतचा पहिला मान गोव्याला
प्रतिनिधी /पणजी
भाजप आणि काँग्रेस यांच्यात आता कोण किती भ्रष्ट यावरून आरोप प्रत्यारोपांचे युद्ध सुरू झाले असून काँग्रेसचे दिनेश गुंडू राव यांनी केलेले आरोप तद्दन खोटे असल्याचा दावा दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार संकल्प आमोणकर यांनी केला आहे. आमच्यामध्ये पैशांचा कोणताही व्यवहार झालेला असल्याचे राव यांनी सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी आहे, असे त्यांनी जाहीर केले. भ्रष्ट आम्ही नव्हे तर राव हेच महाभ्रष्ट असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला.
काँग्रेसच्या आठ आमदारांनी बुधवार दि. 14 रोजी भाजपात प्रवेश केला होता. त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना राव यांनी, काँग्रेस आमदार फोडण्यासाठी 300 कोटीचा व्यवहार झाल्याचा दावा केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमोणकर बोलत होते. त्यावेळी पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक यांची उपस्थिती होती. आम्ही विकाऊ नव्हे तर केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यासाठी कोणतीही अट घातलेली नाही किंवा एका रुपयाचासुद्धा व्यवहार केलेला नाही, असे ते म्हणाले. याऊलट राव यांनी निवडणूक काळात काँग्रेसला अक्षरशः पोखरले. त्यातून त्यांनी 400 कोटी पेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला.
गोवा ’काँग्रेसमुक्त’ होत असल्याचे पाहून त्यांचे नेते वैफल्यग्रस्त बनले आहेत. त्या धसक्यातून सावरता सावरत नसल्यामुळे आता अर्थशुन्य आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत आहेत, असे ते म्हणाले. काँग्रेसचे गोवा प्रभारी असलेल्या गुंडू राव यांनी नीतिमत्ता गमावली आहे. या व्यक्तीने गोव्यात काँग्रेसाठी काहीच केले नाही. कोणतीही जबाबदारी उचलली नाही. त्यांनी केवळ वैयक्तिक स्वार्थ पाहिला आणि स्वतःचे खिशे भरले. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा उचलला.
उमेदवारी देताना प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून मूळचेच गडगंज संपत्तीचे मालक असलेल्यांना उमेदवारी बहाल केली. अशा प्रकारे सुमारे 12 जणांना उमेदवारी दिली व त्या बदल्यात कोटय़वधी रुपये उकळले. यात मायकल लोबो यांचाही समावेश होता, असा दावा आमोणकर यांनी केला.
हा प्रकार एवढय़ावर न थांबता निवडणूक काळात सर्वेक्षण करण्याच्या नावाखाली बंगळूर येथील एका कंपनीस काम दिले. चाळीसही मतदारसंघासाठी प्रत्येकी एक अशी त्यांची समिती बनविली आणि त्यासाठी प्रत्येकी 50 लाख त्यांना फेडले. ही रक्कम सुमारे 20 कोटी रुपये फेडण्यात आली. त्याशिवाय निवडणुकीसाठी ’मिडिया मॅनेजमेंट’ च्या नावाखाली अन्य एका एजन्सीला काम देण्यात आले. ही एजन्सीही बंगळूर येथीलच होती. त्या एजन्सीने कोणते काम केले याची कुणालाच कल्पना नाही. मात्र त्या कामासाठी त्यांना ’न भूतो…’ असे 200 कोटी रुपये फेडण्यात आले, अशी माहिती आमोणकर यांनी दिली.
पक्षाचे विद्यमान अध्यक्ष अमित पाटकर हे एक व्यावसायिक. त्यांना काँग्रेसबद्दल एबीसीडी सुद्धा माहीत नाही. केवळ सहा महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या अशा नवख्या व्यक्तीला त्या पदावर बसविण्यासाठी गुंडूराव यांनी पैसे उकळले. त्यासाठी आमच्यासारख्या अनेक वरिष्ठांनाही त्यांनी डावलले. या सर्वाचे परिणाम आज काँग्रेसला भोगावे लागले असून काँग्रेसचा आता गोव्यातून पार सफाया झाला आहे, असे ते म्हणाले.
अशा भ्रष्ट व्यक्तीला आमच्यावर आरोप करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असे आमोणकर यांनी सांगितले.









