बेळगाव : पक्षाने जबाबदारीचे स्थान दिले आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत सतत परिश्रम घेऊन काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करू, असे युवा काँग्रेसचे नूतन सरचिटणीस राहुल जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोमवार दि. 10 रोजी काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नूतन सरचिटणीस राहुल जारकीहोळी म्हणाले, नुकत्याच झालेल्या युवा काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीत मतदारांच्या आशीर्वादाने सुमारे 1 लाखांहून अधिक मते मिळाली. मतदार आणि तरुणांच्या पाठिंब्यामुळे पक्षात काम करण्यास बळ मिळाले आहे. पक्ष संघटनेसह युवा योजना युवकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला जाईल. पक्षाला तरुणांची गरज आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. वडील पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना बांधणीसाठी पावले उचलली जातील.
सध्या कोणत्याही निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. मंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. सध्या मतदारसंघाच्या निवडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मतदारांचा विश्वास संपादन करणे जरुरीचे आहे. लोकांनी पाठबळ दिल्यानेच राज्यात काँग्रेसचे बहुमत आहे. मात्र, आगामी काळात विविध राज्यात पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी रात्रंदिवस काम केले जाईल. काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी प्रत्येक बूथ व कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीसाठी कार्य करावे. युवकांनी राज्यभर दौरे केल्यास पक्ष मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात युवा मेळावा आयोजित करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, येत्या काही दिवसात राज्यभर दौरा करून महत्त्वाच्या मतदारसंघात युवा मेळावा आयोजित करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे युवा नेते राहुल जारकीहोळी म्हणाले. यावेळी ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फटाक्यांची आतषबाजी
युवा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी राहुल जारकीहोळी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सोमवारी काँग्रेस भवनाला भेट दिली. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. राहुल जारकीहोळी कार्यालयात दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यासह त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच महिलांनी त्यांचे औक्षण केले.









