आम आदमी पक्षाच्या जाहिरनामांचा आधार घेत काँग्रेसने कर्नाटकातील निवडणूकांच्या जाहीरनाम्यात मोफत वीज, मोफत रेशन आणि बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन देऊन या निवडणुकीत विजय मिळवला, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, देशाच्या राजकीय व्यवस्थेत बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आप यशस्वी झाले असून इतर पक्ष देखील आता शिक्षण आणि आरोग्य या मुद्द्यांवरच मते मागत असल्याचा खुलासा त्यांनी केला.
नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, “आम आदमी पक्षाने देशाच्या राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही कर्नाटक निवडणुकांवर नजर टाकली तर काँग्रेस पक्ष आमच्या जाहीरनाम्यावर विजयी झाला आहे. आम्ही मोफत वीज दिली, काँग्रेसनेही अशाच पद्धतीचे आश्वासन दिले आहे. बेरोजगारी भत्ता दिला, मोफत रेशन आणि महिलांना 1,000 रुपये प्रति माह देण्याचे धोरण आमच्याच पक्षाचे आहे” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजपही आता अशाच प्रकारची आश्वासने देत ते यापुर्वी जात आणि धर्माच्या आधारे मते मागायचे. पण अलिकडील भाजपचे जाहीरनाम्यावर लक्ष टाकल्यावर ते आम आदमी पक्षाची नक्कल करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे” असाही दावा त्यांनी केला.
आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले. यामध्ये तीन नगरपालिका अध्यक्ष, सहा नगर पंचायत अध्यक्ष आणि सहा नगर निगम नगरसेवकांच्या जागा जिंकल्या आहेत.